महत्वाचे

अंजनगाव सुर्जी हादरले! शिवकृपा ऍग्रोतून लाखोंच्या खतांचा अपहार; गोडाऊन किपर पोलिसांच्या ताब्यात

-तालुका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जी : खरीप हंगामाची चाहूल लागलेली असतानाच अंजनगाव सुर्जी शहरात खत अपहाराचा मोठा प्रकार समोर आल्याने कृषी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील आठवडी बाजार परिसरात कार्यरत असलेल्या शिवकृपा ऍग्रो कृषी सेवा केंद्राच्या गोडाऊनमधून लाखो रुपयांचे खते परस्पर विकून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी गोडाऊन किपरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कृषी सेवा केंद्राचे संचालक वसंत मोतीरामजी भगत (वय ५४) यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर खत साठवण्यात आले होते. या गोडाऊनची जबाबदारी अंकुश धनंजय धुळे (वय ३०, रा. द्वारका चौक, सुर्जी) याच्याकडे सोपविण्यात आली होती. तो मागील काही वर्षांपासून गोडाऊन किपर म्हणून कार्यरत होता. मात्र, विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने मालकाच्या नकळत गोडाऊनमधील खतांचा साठा कमी करत परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे.

साठा पडताळणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर खताचा तुटवडा आढळून आल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर सखोल तपासणी केल्यानंतर हा अपहार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, डीएपी, पोटॅश यांसारख्या विविध प्रकारच्या खतांच्या एकूण ६६१ पोत्यांची परस्पर विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. या खतांची अंदाजे किंमत सुमारे ११ लाख ९६ हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वसंत भगत यांनी १६ एप्रिल रोजी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी अंकुश धुळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

प्राथमिक तपासात हा अपहार मार्च महिन्याच्या अखेरीस झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीने खत कोणाला विकले, व्यवहाराची रक्कम कुठे व कशासाठी वापरली, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, खरीप हंगामाच्या तोंडावरच खतांचा असा मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवहारात विश्वासाला तडा जाणारा हा प्रकार असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.