महत्वाचे

परतवाड्यात आरोपी अयानच्या घरावर बुलडोझर

व्हिडीओ, फोटो व्हायरलसह लैंगिक अत्याचाराचाही झाला उलगडा अचलपूर, परतवाडावासीयांनी पाळला कडकडीत बंद, नराधमांचा सर्वत्र निषेध

परतवाडा/अचलपूर :  अल्पवयीन मुलींशी जवळीक साधून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रकारामुळे अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात बुधवारी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला, व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. नगरपालिका प्रशासनानेही मुख्य आरोपी अयान अहमद हा वास्तव्यास असलेल्या घराच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवत कारवाईचा बडगा उगारला आहे.

पालिकेला दीड महिन्यापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अयान अहमद याच्या घरावर अतिक्रमणासंदर्भात कारवाईची नोटीस बजावत बुधवारी त्याची तामिलीदेखील केली. त्याच्या घराचा अतिक्रमित जीना काढण्यात आला. घर अनधिकृत असल्यास तेसुद्धा जमीनदस्त केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता.

 

नोटीस बजावली

एसडीओ डॉ. शुभम कुमार, पालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड यांच्या उपस्थितीत आरोपीच्या नातेवाइकाच्या नावावर असलेल्या घराचा लोखंडी जिना अतिक्रमणात येत असल्याने तो बुलडोझरच्या साहाय्याने हटविण्यात आला. उर्वरित बांधकामाबाबत पालिकेने नोटीस बजावली असून, ३० दिवसांत योग्य कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

दीड महिन्यापूर्वी संबंधिताच्या घराचा जिना अतिक्रमणात असल्याची तर दोन दिवसांपूर्वी घराच्या वाढीव बांधकामाबाबतही तक्रार आली होती. त्यानुसार बुधवारी कारवाई केली.

डॉ. धीरज गोहाड, मुख्याधिकारी नगर पालिका अचलपूर

 

व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद

प्रकरणातील आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद (१९) याने १८ व्हिडीओ आणि ३९ फोटो व्हायरल केल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरात संतापाचे वातावरण होते. मंगळवारी झालेल्या बैठकीत शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत बुधवारी सकाळपासूनच परतवाड़ा व अचलपूर येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहिली. नगरपालिकेसमोर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.

 

 

अफवांचे सावट

शहरातील परिस्थिती पाहता ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात दगडफेक झाल्याच्या अफया पसरल्या होत्या, मात्र पोलिसांनी अशा कोणत्याही घटनेचा इन्कार केला आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.