ज्येष्ठांच्या हक्कांवर मार्गदर्शनाचा दीप : अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात उपयुक्त कार्यक्रम

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती यांच्या वतीने आज ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपयुक्त उपक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा न्यायाधीश-१ तथा प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी भूषविले.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी उपेक्षिततेच्या समस्यांवर कायदेशीर उपाय’ या विषयावर जिल्हा न्यायाधीश यशवंत गोस्वामी यांनी प्रकाश टाकला. तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा सरकारी वकिल परिक्षित गणोरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी पुरुषोत्तम गावडे यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे संचालन अॅड. प्राजक्ता वरुडकर यांनी तर आभार प्रदर्शन अॅड. अमित सहारकर यांनी केले. यावेळी जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे पदाधिकारी, कामगार नेता डॉ. दामोदर पवार, अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायिक अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
ज्येष्ठांच्या अधिकार, सन्मान व कायदेशीर संरक्षणाबाबत जागृती निर्माण करणारा हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आणि अर्थपूर्ण ठरला.

