महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय रंगमंचावर भारताची अभिमानशिखरे; सोहम नेसनेसकरची ऐतिहासिक कामगिरी

अंजनगाव सुर्जी : विहिगावचा होतकरू विद्यार्थी व ओम इंटरनॅशनल स्कूल, अंजनगाव सुर्जी येथील इयत्ता पहिलीचा विद्यार्थीदक्ष योगपटू सोहम मोहन नेसनेसकर याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. जून 2025 मध्ये व्हिएतनाममध्ये झालेल्या इंटरनॅशनल योगा स्पर्धेत जपान, मलेशिया आणि व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत सोहमने सुवर्ण पदक पटकावले. अल्पवयात मिळवलेले हे यश उल्लेखनीय ठरत असून त्याच्या कामगिरीचे राज्यभरातून कौतुक होत आहे.

या आंतरराष्ट्रीय विजयाच्या निमित्ताने सोहमचा प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने अमरावती येथे एका भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते सोहमला सन्मानपत्र, मेडल, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करण्यात आले. राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राष्ट्र गौरव पुरस्कार, क्रीडा शिरोमणी राष्ट्रीय पुरस्कार यांसह एकूण १४ विविध सन्मान सोहमच्या नावावर नोंदवले गेले आहेत.

त्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीची दखल केंद्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. अँटी हिरमन फाउंडेशन व नीती आयोग (सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने उदयपूर येथील पंचतारांकित हॉटेल मेरिटयल येथे 27 मार्च 2026 रोजी आयोजित भव्य सोहळ्यात सोहम मोहन नेसनेसकर याला भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारप्रदान सोहळ्यात श्री. एन. के. सिंग (इंडियन आर्मी), श्री. प्रशांत अग्रवाल (अध्यक्ष, नारायण सेवा संस्था, उदयपूर) तसेच मा. श्री. शुभम चौरेसिया (अध्यक्ष, अँटी हिरमन फाउंडेशन, उदयपूर) यांच्या हस्ते सोहमला सन्मानपत्र, आकर्षक व भव्य सन्मानचिन्ह आणि गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.

अल्पवयात देशाच्या पातळीवर मिळवलेल्या या बहुमानांमुळे सोहम नेसनेसकर हा ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून आगामी काळात त्याच्याकडून अधिक गगनभेदी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.