ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

वादग्रस्त ‘कोणार्क’ विरोधात महाएल्गार कंत्राटदाराची मनमानी, प्रशासन हतबल

हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छतेचा बोजवारा; स्ट्राईकला राजकीय फूस असल्याची शक्यता

अमरावती : महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या झोन क्रमांक १ आणि ५ मध्ये बुधवारी स्वच्छता कामगारांनी कोणार्क कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. १४ मार्चपासून कामाचा कंत्राट सोपवूनही कंपनीने ना करारनाम्यानुसार वाहने पुरवली, ना कामगारांना मूलभूत सुविधा दिल्या. या आंदोलनामुळे शहराच्या मोठ्या भागात कचऱ्याचे ढीग साचले असून, गुरुवारी असलेल्या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

करारानुसार काम सुरू होऊन १५ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, कंपनीकडून अद्यापही पुरेशी वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, रात्रंदिवस राबणाऱ्या स्वच्छता कामगारांना ना गणवेश देण्यात आले, ना त्यांच्या ईपीएफ आणि ईएसआयसी बाबत स्पष्टता आहे. नियमबाह्वा कामकाज आणि कामगारांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याने संतापलेल्या कामगारांनी अखेर बुधवारी सकाळपासूनच काम थांबविण्याचा निर्णय घेतला. स्वच्छतेसाठी १२० वाहनांची गरज असताना ती दिसून आली नाहीत.

हनुमान जयंतीवर अस्वच्छतेचे सावट ?

गुरुवारी संपूर्ण शहरात हनुमान जयंतीचा उत्साह असेल. मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. अशावेळी या दोन्ही प्रभागांत कचरा उचलला न गेल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात कंत्राटदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे शहरात दुर्गंधी पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

महापौरांचा दुचाकीने दौरा, पुढे काय ?

गत काही दिवसांपूर्वी स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी सकाळी शहराच्या काही भागांत दौरा केला होता. यावेळी कोणार्क कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अस्वच्छेविषयी त्यांनी ताशेरे ओढले होते. मात्र, महापौरांच्या दौ-यानंतर स्वच्छतेत कोणताही बदल झाला नाही. शहराच्या अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबल्याचे चित्र सर्वदूर आहे.

कोणार्कवर ताशेरे का?

करार धाब्यावरः ना नवीन वाहने, ना साहित्य; तरीही कामकाज सुरू असल्याचा बनाव.

कामगारांचे शोषणः ईपीएफ आणि विम्याच्या सुविधांपासून कामगार वंचित. वाहनांचे कोणीही आरसी बुक तपासले नाही

सणासुदीला कचरा कोंडी: हनुमान जयंतीच्या तोंडावर अमरावतीकरांच्या आरोग्याशी खेळ.

उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी घडून आणला का स्ट्राईक ?

माहितीनुसार, कोणार्कचे ज्युनिअर मालक कालपरवा शहरात होते. त्यांनी अनेकांच्या भेटीदेखील घेतल्या. मात्र एका विशिष्ट राजकारण्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे आपले उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी एका ‘मुकरी’ मार्फत हा संप घडवून आणल्याची चर्चा महापालिकेत रंगली होती. १५ दिवसांत सात दिवस संप होत असल्याने जुने चेहरे कोणार्कची नैय्या बुडविणार की तारणार, अशी कुजबूजदेखील ऐकायला मिळाली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.