गणेशनगरात डेंग्यूचा प्रादुर्भाव — नगर परिषदेच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शहरातील गणेशनगर परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याची घटना समोर आली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषद आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील गटारे साचलेली, मैदानात पाणी तुंबलेले, नाल्यांमध्ये सांडपाणी व गांजरगवत वाढल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी डेंग्यूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, अनेक घरांमध्ये ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येत आहेत. काही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तरीदेखील नगर परिषदेकडून ना फॉगिंग करण्यात आले, ना डास नियंत्रणासाठी औषधफवारणी. शासनाकडून स्वच्छतेसाठी निधी येतो, पण तो प्रत्यक्षात खर्च होतो कुठे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
“गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही सतत तक्रारी व निवेदन देत आहोत. गटारे उघडी पडली आहेत, साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी यांना कळवले असता त्यांनी आरोग्य विभागाला सांगतो असे सांगितले, परंतु कुठलीही कारवाई झालेली नाही. आरोग्य विभाग फक्त कागदोपत्री कारवाई करतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक उमेश चौखंडे यांनी दिली.
नागरिकांच्या वारंवार तक्रारींनंतरही आरोग्य विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणीस आलेले नाहीत. परिसरात सफाई कामगार अनियमितपणे येतात, कचरा उचलण्याचे काम होत नाही. परिणामी शाळकरी मुले व वृद्ध नागरिक या आजाराला बळी पडत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून गांजरगवत निर्मूलन आणि औषध फवारणी न झाल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम, फॉगिंग तसेच आरोग्य शिबिर आयोजित करण्याची मागणी केली आहे.
“जर काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर नगर परिषद आरोग्य विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते उमेश चौखंडे यांनी दिला आहे.

