महत्वाचे

‘संवाद सहवास’ — विचारांना नवी दिशा देणारा उपक्रम! भारताचे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्यासोबत दोन दिवसांचा संवाद

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : संवादातून माणसाचा विकास होतो, विचारांना चालना मिळते आणि समाज उन्नतीच्या दिशेने वाटचाल करतो. याच भावनेतून अक्षर मानव या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेकडून ‘संवाद सहवास’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात समाजातील मान्यवर, विचारवंत, अभ्यासू व्यक्तींशी दोन दिवस सलग संवाद साधून त्यांचं कार्य, विचार आणि जीवन जाणून घेण्याची संधी सहभागीना मिळते.

या वर्षीचा संवाद सहवास भारताचे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्री. राजू परुळेकर यांच्या सहवासात होणार आहे. हा दोन दिवसीय निवासी कार्यक्रम पुणे येथील शिक्षक भवन, नवी पेठ, गांजवे चौक (पत्रकार भवनाजवळ) येथे दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखक, कथा–कादंबरीकार मा. राजन खान, तसेच अक्षर मानव राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अक्षर मानवचे राज्य संघटक (विदर्भ संचालक) श्री. आझाद खान यांनी अमरावती येथे माहिती देताना सांगितले की, या आधीचे संवाद सहवास डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, निखिल वागळे, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, डॉ. कुमार सप्तर्षी, विवेक सावंत, ॲड. असीम सरोदे आदी मान्यवर व्यक्तींशी झाले आहेत.

अक्षर मानव ही संघटना केवळ कला आणि साहित्यापुरती मर्यादित नसून, समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम, कार्यशाळा, आणि सांस्कृतिक उपक्रम राबवते. बौद्धिक विकास, सामुदायिक बांधिलकी आणि माणुसकीची भावना वाढविणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. “माणूस म्हणजे माणूस — जाती, धर्म, पंथ, लिंग यापलीकडे जाऊन एकत्र येणं हाच आमचा संकल्प आहे,” असे श्री. आझाद खान यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी सहभागींच्या निवास, जेवण आणि चहाची उत्तम व्यवस्था अक्षर मानवकडून केली आहे. उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक असून, इच्छुकांनी प्रा. गणेश आवटे (जिल्हा अध्यक्ष, पुणे) — मोबाईल: 9766096906 यांच्याशी संपर्क साधावा.

अमरावती अक्षर मानवच्या जिल्हा सचिव सौ. अश्विनी वितोंडे-खान यांनी आवाहन केले आहे की, “माणसाला माणूस जोडणाऱ्या या उपक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, संवादातून नवे विचार, नवे दृष्टीकोन, आणि नवी दिशा मिळवावी.”

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.