ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ : अमरावतीत बचत उत्सव मोहिमेला सुरुवात

 

मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचे डाक विभागाचे आवाहन

अमरावती : अमरावती डाक विभागातर्फे सध्या बचत उत्सव विशेष मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेत मुलींच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेली सुकन्या समृद्धी योजना ही “बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ” या अभियानाशी जोडलेली असून मुलींच्या भविष्याचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. पालक आपल्या मुलीचे खाते तिच्या वयाच्या १० वर्षांपर्यंत कोणत्याही डाकघरात किमान २५० रुपयांच्या ठेवीवर उघडू शकतात. या योजनेचा सध्याचा व्याजदर ८.२ टक्के असून ही योजना सुरक्षित व लाभदायक ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्मदाखला, आधारकार्ड तसेच पालकांचे आधारकार्ड व पॅनकार्ड अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी व भविष्यातील गरजांसाठी योग्य भांडवल उभे राहावे या हेतूने केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.
या विशेष बचत उत्सव मोहिमेत जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी, शाळा, अंगणवाडी तसेच स्वयंसेवक घराघरात जाऊन पालकांमध्ये जनजागृती करत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालकांनी आपल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी खात्यासह डाक विभागाच्या इतर बचत योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.