महाराष्ट्र

‘संवाद सहवास’चा अनोखा प्रयोग : संपूर्ण गावाशी संवादातून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : समाजपरिवर्तनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अक्षर मानव संस्थेचा बहुप्रतिक्षित ‘संवाद सहवास’ कार्यक्रम यंदा एका वेगळ्याच संकल्पनेत रंगणार आहे. दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सौंदाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी कोणत्याही एका व्यक्तीऐवजी संपूर्ण गावच संवादाचे केंद्रबिंदू असणार आहे.

ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील सौंदाळा हे राज्यातील पहिले “जातमुक्त गाव” म्हणून ओळखले जाते. गावातील नागरिकांनी ‘माझी जात मानव’ ही भावना स्वीकारत सामाजिक एकात्मतेचा आदर्श घडवला आहे. सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, विवाह, सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांतून जातिभेद पूर्णपणे नष्ट करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी सामूहिकरीत्या राबवला आहे. या परिवर्तनाचा प्रवास आणि त्यामागील प्रेरणा प्रत्यक्ष गावकऱ्यांकडून ऐकण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून गावचे सरपंच शरद अरगडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून संपूर्ण सौंदाळा गावच उपस्थित राहणार असून सामूहिक अनुभवांची मांडणी हीच या उपक्रमाची खरी ताकद ठरणार आहे.

या कार्यक्रमाला प्रख्यात साहित्यिक व कादंबरीकार डॉ. राजन खान यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. संस्थेचे राज्य नियंत्रक आझाद खान यांनी माहिती देताना सांगितले की, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासातून विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि समाजउन्नतीसाठी प्रेरणा मिळावी, हा ‘संवाद सहवास’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यापूर्वी या उपक्रमांतून डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके, संजय आवटे, डॉ. कुमार सप्तर्षी, सयाजी शिंदे, डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. सुचेता धामणे, निरंजन टकले, ॲड. असीम सरोदे, विवेक सावंत, राजू परुळेकर यांच्यासोबत संवाद सहवास आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व सहभागींसाठी जेवण व चहाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. मात्र उपस्थित राहण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे, अशी माहिती राज्य संघटक प्रा. सुजित चव्हाण यांनी दिली. स्थानिक नियोजनाची जबाबदारी समाजसेवा विभागाचे राज्य संघटक हरिभाऊ उगले व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे आहे.

या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य किन्हीकर, महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. प्रवीण जावळे, राज्य उपाध्यक्ष दीपेश मोहिते आणि संपूर्ण राज्य कार्यकारिणीने केले आहे. आयोजकांच्या मते, शांत व निवांत वातावरणात होणारा हा संवाद समाजमनात सकारात्मक परिवर्तनाची नवी बीजे पेरणारा ठरेल.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.