आरोग्यताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालयातील उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह; जखमी पत्रकाराला ‘फक्त पट्टी’ देऊन परत पाठविल्याचा आरोप

अंजनगाव सुर्जी/अचलपूर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणणारी आणि शासकीय रुग्णालयांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना अंजनगाव सुर्जी व अचलपूर परिसरात घडल्याचे समोर आले आहे. पायाला गंभीर दुखापत झालेल्या एका पत्रकाराला आवश्यक वैद्यकीय उपचाराऐवजी केवळ प्राथमिक स्वरूपाची पट्टी बांधून परत पाठविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दैनिक आपली मातृभूमीचे पत्रकार सचिन इंगळे यांना पायाला दुखापत झाल्यानंतर त्यांनी १७ एप्रिल २०२६ रोजी अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेतली. तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या दुखापतीचे स्वरूप लक्षात घेता एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार एक्स-रे काढण्यात आला. पुढील दिवशी म्हणजे १८ एप्रिल रोजी एक्स-रे अहवाल मिळाल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी पायाला फ्रॅक्चर असल्याची शक्यता व्यक्त करत पुढील उपचारासाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचे निर्देश दिले.

 

निर्देशानुसार सचिन इंगळे दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. तेथे नियमित प्रक्रिया पूर्ण करून त्यांना एका वार्डमध्ये पाठवण्यात आले. प्राथमिक तपासणीदरम्यान संबंधित डॉक्टरांनी अहवालाची ओझरती पाहणी करून त्यांना दुसऱ्या वार्डमध्ये जाण्यास सांगितले. यानंतर घडलेली घटना मात्र आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण म्हणून समोर येत आहे.
सदर वार्डमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित वैद्यकीय उपचार न देता केवळ साधी पट्टी बांधण्यात आली. फ्रॅक्चरचा संशय असताना प्लॅस्टर न करता रुग्णाला परत पाठविणे हे वैद्यकीय दृष्टीने गंभीर बाब मानली जाते. याच दरम्यान, उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्याने स्वतःला प्लॅस्टरविषयी अनुभव नसल्याचे सांगितल्याची माहिती पुढे येत आहे. या विधानामुळे रुग्णालयातील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
दरम्यान, योग्य उपचार मिळावेत या अपेक्षेने संबंधित पत्रकाराने पुन्हा डॉक्टरांचा शोध घेतला. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. आपत्कालीन स्वरूपाची परिस्थिती असताना डॉक्टर अनुपस्थित असल्याचा आरोपही या प्रकरणात पुढे येत आहे.
या संपूर्ण घटनेमुळे शासकीय रुग्णालयांतील समन्वयाचा अभाव, रुग्णांप्रती असलेली बेफिकिरी आणि जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती अधोरेखित होत आहे. एका रुग्णाला वार्डवरून वार्डमध्ये पाठविले जात असताना त्याच्या उपचाराची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, याबाबत स्पष्टता नसल्याचे दिसून येते. परिणामी, रुग्णांची गैरसोय होऊन त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

विशेष म्हणजे, ग्रामीण व उपजिल्हा स्तरावरील रुग्णालयांमध्ये नागरिक मोठ्या विश्वासाने येतात. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे त्या विश्वासाला तडा जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाकडून उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ व उपकरणे याबाबत मोठमोठे दावे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे.
या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी तसेच रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. अन्यथा अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याबाबतही स्पष्टता येणे आवश्यक असून, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.