दिव्यांग बांधवांसाठी संवेदनशील उपक्रम; बेलखेडा ग्रामपंचायतीकडून शिवजयंतीनिमित्त १४ लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य

शंतनू इंगळे प्रतिनिधी बेलखेडा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव ग्रामपंचायत बेलखेडा येथे उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामपंचायतीने समाजहिताचा आदर्श ठेवत ५ टक्के दिव्यांग निधी अंतर्गत गावातील १४ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले असून ग्रामपंचायतीच्या सामाजिक दायित्वाची गावकऱ्यांकडून प्रशंसा होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सचिव शरद प्रल्हादराव जयसिंगपूर होते, तर सरपंच मंगली चिरोजी पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी उपसरपंच शाळीग्राम बेठे, सदस्य देवराव धोटे, सोनकलाल कास्देकर, रमेश कास्देकर, सरस्वती दिवाणे, काशीबाई कास्देकर, रूपाय गावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले.
सामाजिक ऐक्य आणि परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच दिव्यांग बांधवांना स्वावलंबनाचा आधार मिळावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केले. गावाच्या सर्वांगीण विकासासोबतच समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्याची बांधिलकी ग्रामपंचायत सातत्याने जपत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी सोनम काळे, अनिल कुसुम, भोला साकोम, पुर्णा काळे, रवी कास्देकर, निलेश मावस्कर, राजेश बेठे, शंकर बेटे, आरती दिवठाणे, बुरी बेलसरे, हेमराज राजणे, राजाराम तोटे, पवन साकोम, पतिराम बेठे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी होते.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला सामाजिक उपयुक्ततेची जोड मिळाली असून गावात समाधान आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

