ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

14 जूनला अमरावतीत जिल्हा काँग्रेसचा मशाल मोर्चा

जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची पत्रकार परिषदेतून माहिती

अमरावती  : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या गंभीर अनियमितता, मतमोजणी प्रक्रियेमधील संशयास्पद घडामोडी, आणि निवडणूक आयोगाच्या संदिग्ध भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. याकरिता जिल्हा काँग्रेसच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, जिल्हाधिकारी कार्यालय येथे 14 जून रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर येथून मशाल मोर्चाला सुरुवात होईल, इर्विन चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर  मोर्चाचा समारोप होईल, याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. बबलू देशमुख यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राष्ट्रपती, राज्यपालांना दिलं जाणार निवेदन

यावेळी खासदार बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती, बबलू देशमुख म्हणाले, “ही निवडणूक निष्पक्ष नव्हती. मतदार यादीतील तांत्रिक चुका, ईव्हीएममध्ये हस्तक्षेप, आणि प्रशासनाच्या दबावामुळे निवडणूक आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने वेळोवेळी यावर आक्षेप नोंदवले आहेत, पण अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.”

“लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जनता जागृत झाली पाहिजे. काँग्रेस पक्ष केवळ सत्ता नाही, तर मूल्यांसाठी लढतो आहे.”या पार्श्वभूमीवर १४ जून रोजी अमरावती येथे भव्य मशाल मोर्चा आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये काँग्रेसचे सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचा सहभाग अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा. राष्ट्रपती आणि राज्यपालांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.

मतदारांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार

कामठी मतदारसंघातील मतदानातील संशयास्पद वाढ याकडे लक्ष वेधताना देशमुख म्हणाले, “लोकसभेतील भाजपची मते १.१९ लाख होती, परंतु अवघ्या काही महिन्यांत ती १.७५ लाखांवर पोहोचली, म्हणजेच ५६ हजार मतांची वाढ झाली. कामठीत ३५ हजार नवीन मतदार नोंदवले गेले, आणि त्यातील जवळपास सर्वच मत भाजपकडे गेले यावर कोणताही विश्वास ठेवू शकत नाही. ही बाब निवडणूक आयोगाने गंभीरतेने तपासावी.”

खासदार बळवंत वानखडे म्हणाले “ही लढाई केवळ काँग्रेसची नाही, ही लढाई देशाच्या लोकशाही मूल्यांची आहे. कुठल्याही दबावाला झुकता कामा नये. संविधान, स्वातंत्र्य आणि जनतेचा अधिकार वाचवण्यासाठी आम्ही संघर्ष चालूच ठेवू.” या पत्रकार परिषदेला हरिभाऊ मोहोड, प्रदीप देशमुख, संजय बेलोकार, संजय वानखडे यांचे सह काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी, युवा नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.