तारेच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू
अड्याळ वनपरिक्षेत्रातील मलकाझरी येथील घटना

अड्याळ : भंडारा वनविभागांतर्गत येणार्या अड्या वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र माडगी नियत़क्षेत्र कुरकाबोडी १ येथील मलकाझरी येथील एका खाजगी शेतीच्या पीक संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. सदर घटना दि.८ जून २०२५ रोजी उघडकीस आली आहे.
मलकाझरी शेतशिवारासभोवताल जंगल असून वन्यप्राण्यांसह हिंस्त्र प्राण्यांचा शेतशिवारात मुक्त संचार पाहावयास मिळत आहे. शेतशिवारातील एका शेतकर्याने शेतपिकाचे संरक्षण करण्याकरीता तारेचा कुंपण केला होता. शिकारीच्या शोधात शेतशिवारात आलेल्या बिबट्याने कुंपणातून शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र तारेच्या कुंपणात अडकला. बिबट प्राण वाचविण्यासाठी धडपड करुन अखेर दमल्याने मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष पशुवैद्यकीय अधिकार्यांकडून व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकारी व वनकर्मचारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात आली. घटनास्थळी पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार, डॉ. सुरेश निपाणे, डॉ. स्नेहा मेश्राम, यांची समिती गठीत करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे प्रतिनिधी नामदेव मेश्राम, मैत्र वन्यजीव संस्था तसेच मानद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख उपस्थित होते.
वन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी, यांच्या चमूने मृत बिबट्याची पाहणी केली असता बिबट हा अवयस्क नर जातीचा असून जवळपास सात ते आठ वर्ष वयोगटातील असल्याचे आढळून आले. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले. पशुधन विकास अधिकार्यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करुन त्याचे दहन करण्यात आले.
सदर प्रकरणाची वनअपराधाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपवनसंरक्षक भंडारा राहुल गवई यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ विवेक येवतकर करीत आहेत. सदर कार्यवाही क्षेत्र सहाय्यक माडगी डी. एस. रंगारी, बीट रक्षक पी. सी. गजभिये, एन. एस. हटवार, के. एस. सानप, एम. एल. शहारे, एस. एस. रंगारी, एन. जी. श्रीरामे, आदी उपस्थित होते.
वन्यप्राण्यांची सुरक्षा धोक्यात
वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेकरीता शासन स्तरावर वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. मात्र वनविभागाच्या वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. दरवर्षी रस्ता अपघात, विद्युत प्रवाह, विष प्रयोग व अन्य कारणाने अनेक वन्यप्राण्यांसह हिंस्त्र प्राण्यांचा बळी जात आहे. जंगला सभोवताल तारेचे कुंपण करण्याचे प्रस्तावित असतांना अनेक ठिकाणी कामे रखडलेली आहेत. महामार्ग ओलांडतांना रस्ता अपघातात अनेक प्राण्यांचा जीव जात आहे.
वन्यप्राण्यांचा आवागमन असलेल्या ठिकाणी महामार्गांना भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित असतांना अशी कामे रखडलेली आहेत. शासनाचा कोट्यवधीचा निधी खर्च होत असतांना वन्यप्राण्यांची सुरक्षा धोक्यात आल्याने वन्यप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. याकडे वनविभागाने तसेच शासनाने वन्यप्राण्यांच्या संरक्षणाकरीता कठोर उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

