ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

राजूल पटेलांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, आता अनिल परब म्हणतात…

राजूल पटेलांनी पक्ष प्रवेश करताना वर्सोवा मतदारसंघामधील अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला धन्यवाद दिलेत. सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेंनी आम्हाला मदत केल्याचंही त्यांनी सांगितलंय.

मुंबई- राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीचा जसजसा माहोल होत चाललाय, तशाच अनेक आयाराम-गयारामांची संख्याही वाढली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या नावाजलेल्या नेत्या आणि माजी स्थायी समिती सभापती राजूल पटेल यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटदेखील जोरदार तयारी करताना पाहायला मिळतोय. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंदाश्रम येथे आले असता त्यांनी शक्तिस्थळाला भेट देत आनंद दिघेंना अभिवादन केलंय. या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्ष प्रवेशदेखील झालाय. यात राज्यभरातील कार्यकर्त्यांचा समावेश होता, तसेच यात अनेक मंत्र्यांचादेखील सहभाग होता.

वैद्यकीय मदत दिलेल्या बाळाचे केले नामकरण : राजूल पटेल यांनी पक्ष प्रवेश करताना वर्सोवा मतदारसंघामधील अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला धन्यवाद दिलेत. सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला मदत केली असून, पुढेदेखील ही मदत होत राहणार असल्याची प्रतिक्रिया राजूल पटेल यांनी दिलीय. या कार्यक्रमाच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून एका बाळाला जन्मावेळी मदत झाली होती, त्याच बाळाचे नामकरण करण्यात आलंय. त्याचे नाव रुद्र असे ठेवण्यात आले असून, त्यावेळी बाळाचे पालकसुद्धा बाळासह उपस्थित होते.

विरोधकांचे अधःपतन होणार- शिंदे : या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी जी कामं झालीत, त्या कामांवर प्रभावित होऊन अनेक लोक पक्ष प्रवेश करीत आहेत, असे सांगत लाडक्या बहिणीवर टीका केल्यामुळे विरोधकांचं अधःपतन झाल्याचे सांगितलंय.

 

त्यांना कोणी वाईट वागणूक देईल हे मान्य नाही : विशेष म्हणजे राजूल पटेल हे स्थानिक नेत्यांना कंटाळून शिंदे गटात गेल्याबाबत विचारलं असता अनिल परब म्हणाले की, जाणाऱ्या माणसाला कोणावर तरी खापर फोडावं लागतं. आता नवीन निवडून आलेल्या माणसाला किती दिवस झालेत. अजून दोन महिने पण झाले नाहीत. राजूल पटेल यांना मी गेली कित्येक वर्ष ओळखतो. माझ्याबरोबर त्या विभागप्रमुख होत्या. शिवसेनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्या कोणाच्या तरी दबावाखाली येतील अन् त्यांना कोण तरी वाईट वागणूक देईल हे मला मान्य नाही. त्याचं कारण म्हणजे मी त्यांना ओळखतो. त्या कोणाचं ऐकून पण घेणार नाहीत. पण आता सोडून जाताना काही ना काही तरी कारण पाहिजे. म्हणून हे कारण दिलं. राजू पेडणेकरांशी त्यांचा वाद होता. परंतु ही कारणं सांगितली जातायत, पण खरी कारणं मला माहीत नसल्याचंही अनिल परब म्हणालेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.