टेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशफॅशनमहत्वाचेमहाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का ? कुणाल पाटील भाजपात जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

काँग्रेसचे युवा नेते कुणाल पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर आता खुद्द कुणाल पाटलांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

धुळे : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र आता कुणाल पाटील यांनीच या चर्चांवर मोठं भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी खासगी कामासाठी रविंद्र चव्हाण यांना भेटल्याचं कबूल केलं आहे.

कुणाल पाटील भाजपात जाणार? : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं भाजपानं आपलं ‘धक्का तंत्र’ आणखी तीव्र केलं आहे. भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्या गोटात खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून, धुळे काँग्रेसला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुणाल पाटील आणि रवींद्र चव्हाण यांची भेट : धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा जोरात सुरू आहे. या गुप्त भेटीनंतर कुणाल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांचा धुळे जिल्ह्यातील युवा आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून दबदबा आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतरानं काँग्रेसला धुळ्यात मोठा धक्का बसू शकतो, तर भाजपाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

कुणाल पाटील काय म्हणाले? : दरम्यान, या सर्व चर्चा सुरू असताना, ई टीव्ही भारतनं कुणाल पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या या सर्व अफवा असल्याचं सांगितलं. पाटील म्हणाले की, “रवींद्र चव्हाण यांना भेटल्यानं अशा चर्चांना सुरुवात झाली. त्यांना मी माझ्या वैयक्तिक कामासाठी भेटलो होतो. त्यामुळे या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. अशा प्रकारची चर्चा झालीच तर मी स्वत: माध्यमांना ही माहिती देईन”, असंही कुणाल पाटील यांनी स्पष्ट केलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.