ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

विघ्नकर्ते हद्दपार! बाप्पाच्या आगमनात विघ्न नको म्हणून नाशिकमधील 200 सराईत गुन्हेगार तडीपार

नाशिकमध्ये बाप्पाच्या आगमनात विघ्न नको म्हणून शहरातील 200 सराईत गुन्हेगार तडीपार करण्यात आलेत.

नाशिक – गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी नाशिक पोलिसांनी शहरातील तब्बल 200 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. तसेच आतापर्यंत गुन्हेगारांशी हितसंबंध ठेवणाऱ्या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याने गुन्हेगार धास्तावले आहेत.

पोलीस यंत्रणा सतर्क – गणेशोत्सव आणि त्यापाठोपाठ नवरात्र उत्सवाचे बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या अनुषंगाने शहरातील 13 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली. तब्बल 200 सराईत गुन्हेगारांना याकाळात तडीपार करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार असल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

तडीपारीनंतरही शहरात वावर – दरवर्षी सण उत्सवानिमित्त पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जाते. मात्र तडीपार असतानाही अनेकजण शहरात वावरताना दिसतात. यंदा मात्र पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा एक, गुन्हे शाखा दोन, खंडणी विरोधी पथक, गुंडाविरोधी पथक ,पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आदींना शहरात वावर असणाऱ्या तडीपार गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई – तडीपारीबरोबरच अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. अशा गुन्हेगारांना तीन ते सहा महिने कारागृहात डांबले जाणार आहे. अंबड पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार अनिल पिठेकर याच्यावर 28 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अट्टल गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कठोर कारवाई केली जाणार – आगामी उत्सव आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अजून कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले.

गणेश उत्सव काळातील पोलीस बंदोबस्त – पोलीस उपायुक्त 4, सहाय्यक पोलीस उपायुक्त 6, पोलीस निरीक्षक 50, एमपीएतील प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी 30. सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक 250. पोलीस अंमलदार 2800. होमगार्ड 1000. एसआरपीएफ तुकडी 1. आरसीपी तुकडी 2. रॅपिड ऍक्शन फोर्स तुकडी 1.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.