महाराष्ट्र

दहिगाव रेचा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात बेमुदत उपोषणाला सुरुवात

रस्ता दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासन-प्रशासनाकडे तातडीची मागणी; विविध संघटना-मंडळांचा पाठिंबा

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी ते दहिगाव रेचा या महत्त्वाच्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला असून रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणाच्या मागणीसाठी दहिगाव रेचा येथे बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामगीताचार्य मनोहर रेचे यांनी गुरुवारी (दि. १२ मार्च) पासून अन्नत्याग करून उपोषणाला प्रारंभ केला असून परिसरातील ग्रामस्थ आणि विविध सामाजिक-धार्मिक संघटनांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला आहे.

राष्ट्रीय महामार्गालगत असलेला अंजनगाव सुर्जी-दहिगाव रेचा हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीअभावी खड्डेमय झाला आहे. या मार्गावरून दहिगाव रेचा, शेलगाव, वढाली, धाडी, जनोना, गरजधरी, पळसखेड, खिरपाणी तसेच मेळघाट परिसरातील अनेक गावांचा दळणवळणाचा संपर्क आहे. जंगल क्षेत्राशी जोडणारा आणि ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी ठरलेला हा मार्ग असल्याने रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने वाहनधारक, शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने नागरिकांना शासकीय कामे, बाजारपेठ, शिक्षण, आरोग्य सेवा आदी कारणांसाठी दररोज या मार्गावरून प्रवास करावा लागतो. खराब रस्त्यामुळे प्रवास करताना वाहनचालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः गंभीर रुग्ण, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगितले जात आहे.

शेतकरी वर्गालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेताना याच मार्गाचा वापर करावा लागतो. खराब रस्त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असून वेळेचा मोठा अपव्यय होत असल्याने शेतकऱ्यांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. “रस्ता म्हणजे विकासाची कणा” असल्याचे सांगत नागरिकांनी तातडीने या मार्गाचे दुरुस्ती व नूतनीकरण करण्याची मागणी शासन-प्रशासनाकडे केली आहे.
या मागणीसाठी ग्रामगीताचार्य मनोहर रेचे यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून आंदोलनस्थळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विविध सामाजिक, धार्मिक व युवक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळ, वारकरी संप्रदाय, समता सैनिक दल, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, श्री महादेव संस्थान, सर्व बचत गट, गायत्री परिवार, नित्यानंद भक्त मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, छत्रपती ग्रुप, ऑटो रिक्षा युनियन, सर्व विद्यार्थी गण, श्री जगदंबा देवी संस्थान, शेतकरी संघटना, सर्व नोकरदार वर्ग, प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना, अंजनगाव तालुका गुरुदेव सेवा मंडळ, लोकजागर संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती तसेच उडान चॅरिटेबल ट्रस्ट यांचा समावेश आहे.

दहिगाव रेचा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी साखळी व लाक्षणिक उपोषणाद्वारे आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीची दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.