अंजनगाव सुर्जी शहरात डासांचा कहर; आठ दिवसांत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी शहरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांचे जगणे अक्षरशः त्रस्त झाले आहे. शहरातील विविध भागांमध्ये साचलेले घाण पाणी, नाल्यांची अपुरी साफसफाई आणि डास प्रतिबंधक फवारणीचा अभाव यामुळे डासांचे प्रमाण झपाट्याने वाढले असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकजागर संघटना आणि पतंजली परिवार यांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात नगरपरिषद अंजनगाव सुर्जीचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांना निवेदन देण्यात आले. शहरातील अनेक वस्त्या व गल्लीबोळांमध्ये मागील काही महिन्यांपासून डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना दिवसरात्र त्रास सहन करावा लागत आहे. संध्याकाळी तर परिस्थिती अधिकच बिकट होत असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील काही भागांमध्ये नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषदेकडून नियमितपणे औषध फवारणी व फॉगिंग मोहीम राबवली जात नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सर्व भागांमध्ये औषध फवारणी, फॉगिंग मोहीम आणि नाल्यांची नियमित साफसफाई करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ठोस उपाययोजना न झाल्याने आता संताप व्यक्त होत आहे. शहरातील आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाने येत्या आठ दिवसांत संपूर्ण शहरात व्यापक स्तरावर डास प्रतिबंधक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावेळी लोकजागर संघटना व पतंजली परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

