मेळघाटातील चिखलदरा कॉफीला राष्ट्रीय ओळख देणार
दिल्लीपर्यंत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : मेळघाटातील निसर्गरम्य चिखलदरा परिसरात उत्पादित होणाऱ्या कॉफीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून चिखलदरा ते दिल्लीपर्यंत तिची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार राज्याचे महसूल तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. स्थानिक महिलांच्या स्वयंरोजगाराला चालना देत पर्यटनासोबतच उद्योगविकासाचा नवा मार्ग खुला करण्यासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच पार पडलेल्या ‘उमेद’ अंतर्गत आयोजित वैदर्भीय महिला मेळाव्यात बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी हा विश्वास व्यक्त केला. या मेळाव्यात विदर्भातील विविध बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्या स्टॉल्सना भेट देताना त्यांनी विशेषतः मेळघाटातील चिखलदरा येथे कार्यरत असलेल्या ‘स्फूर्ती क्लस्टर कॉफी’ या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. या उपक्रमाद्वारे स्थानिक आदिवासी महिलांनी कॉफीवर आधारित विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करून उद्यमशीलतेचा नवा आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, चिखलदरा हे विदर्भातील एकमेव ठिकाण आहे जिथे कॉफीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. या कॉफीला विशिष्ट चव आणि दर्जा असल्यामुळे तिची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कॉफी उत्पादनाशी संबंधित प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विपणन यासाठी शासन स्तरावर योजना राबविण्यात येतील. चिखलदऱ्याची कॉफी राज्यापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचावी, यासाठी दिल्लीसह मोठ्या बाजारपेठांपर्यंत थेट संपर्क प्रस्थापित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्यातील स्टॉल्सची पाहणी करताना त्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या कामाचे कौतुक केले. या प्रसंगी मीनाक्षी भालेराव आणि भारती भालेराव यांनी कॉफीपासून तयार करण्यात आलेल्या सौंदर्यप्रसाधनांची आकर्षक उत्पादने पालकमंत्री बावनकुळे यांना भेट म्हणून दिली. स्थानिक स्तरावर तयार होणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण उत्पादनांमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चिखलदरा परिसरातील कॉफी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र स्तरावरही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिखलदरा कॉफीवर आधारित मूल्यवर्धित प्रकल्प उभारण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे.
इतिहासाच्या दृष्टीने पाहिले असता, चिखलदऱ्यात कॉफी लागवडीचा प्रारंभ ब्रिटिश काळात झाला होता. सुमारे १८२० च्या सुमारास ‘मुल्हेरन कॉटेज’ येथे कार्यरत असलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्याने केरळमधून कॉफीची रोपे आणून येथे लागवड करण्याचा प्रयोग केला. त्या प्रयोगातूनच या डोंगराळ भागात कॉफीची परंपरा सुरू झाली. आजही या भागातील शेतकरी अरेबिका प्रकारातील कॉफीचे उत्पादन घेत असून तिची चव आणि सुगंधामुळे ती वेगळी ओळख निर्माण करत आहे.
सध्या चिखलदऱ्यात उत्पादित होणारी कॉफी महाराष्ट्रातील विविध शहरांसह मुंबई आणि बेंगळुरू येथेही पाठवली जाते. येत्या काळात तिचे ब्रँडिंग करून राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी शासन व विविध संस्थांच्या सहकार्याने ठोस पावले उचलली जाणार असल्याची माहिती या मेळाव्यात देण्यात आली.
पर्यटन, कृषी आणि महिला स्वयंरोजगार या तिन्ही क्षेत्रांना जोडणारा हा उपक्रम मेलघाटाच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. स्थानिक उत्पादकांना प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि विपणन सुविधा उपलब्ध करून दिल्यास चिखलदऱ्याची कॉफी देशाच्या कॉफी नकाशावर ठळकपणे उमटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

