महाराष्ट्र

अंजनगाव सुर्जीचा बस आगार प्रश्न ऐरणीवर : वर्षानुवर्षांची प्रतीक्षा, निवडणुकीपुरती आश्वासने; मुख्य दर्जा कधी मिळणार?

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
अंजनगाव सुर्जी शहरातील एस.टी. बस आगाराला अद्याप मुख्य बस आगाराचा अधिकृत दर्जा मिळालेला नसल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध असतानाही केवळ दर्जावाढीच्या निर्णयाअभावी शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अपेक्षित विकास रखडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे प्रशासकीय व व्यापारी केंद्र असून शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या लोकसंख्येचा प्रवासासाठी एस.टी. महामंडळावर प्रामुख्याने आधार आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आरोग्यसेवा यासाठी दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. सध्या अस्तित्वात असलेल्या बस आगारातून बस फेऱ्या सुरू असल्या तरी मुख्य बस आगाराचा दर्जा नसल्यामुळे नवीन मार्ग, वाढीव फेऱ्या, देखभाल-दुरुस्ती यंत्रणा आणि प्रशासकीय सुविधा यावर मर्यादा येत आहेत.
मुख्य दर्जा नसल्याचा थेट परिणाम प्रवाशांवर होत असून सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत बस अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही महत्त्वाच्या मार्गांवरील बससेवा मर्यादित असल्याने नागरिकांना इतर तालुका ठिकाणांवरून प्रवास करावा लागत आहे. याचा आर्थिक आणि वेळेचा अतिरिक्त भार सर्वसामान्यांवर पडत आहे.
या प्रश्नाचा फटका एस.टी. महामंडळातील कर्मचारी वर्गालाही बसत आहे. कायमस्वरूपी देखभाल सुविधा, प्रशासकीय कार्यालयीन सोयी, तांत्रिक यंत्रणा अपुऱ्या असल्याने कामकाजावर ताण वाढत असल्याची भावना चालक, वाहक व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, बस आगाराच्या मुख्य दर्ज्याचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीत हमखास चर्चेत येतो. प्रचारादरम्यान आश्वासनांची बरसात होते; मात्र निवडणूक संपताच हा विषय पुन्हा दुर्लक्षित केला जातो, असा ठपका नागरिकांकडून ठेवला जात आहे. यासाठी यापूर्वी अनेकदा निवेदने, पाठपुरावा व मागण्या करण्यात आल्या; मात्र आजतागायत ठोस निर्णय झालेला नाही.
“प्रस्ताव नेमका कुठे अडला आहे? निधीचा प्रश्न आहे की प्रशासकीय उदासीनता? की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव?” असे सवाल आता उघडपणे उपस्थित होत आहेत. मात्र याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यास संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधी पुढे येताना दिसत नसल्याने नाराजी अधिकच वाढत आहे.
व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामीण भागातील प्रवाशांच्या दृष्टीने मुख्य बस आगार ही केवळ सुविधा नसून विकासाची गरज असल्याचे नागरिकांचे ठाम मत आहे. तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्षम व विस्तारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपरिहार्य असून त्यासाठी अंजनगाव सुर्जी बस आगाराला मुख्य दर्जा देणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुर्जी बस आगाराला तातडीने मुख्य बस आगाराचा दर्जा देण्यात यावा, वाढीव बसफेऱ्या व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसेच यासंदर्भात एस.टी. महामंडळाने व लोकप्रतिनिधींनी स्पष्ट आणि कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
हा प्रश्न राजकारणापलीकडचा असून तो थेट जनहिताशी निगडित आहे, असे सांगत नागरिकांनी केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष निर्णय आणि अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे. येत्या काळातही जर यावर तोडगा निघाला नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. अंजनगाव सुर्जी बस आगाराला मुख्य दर्जा मिळणार की नाही, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.