‘दादा ज्याप्रमाणे कठोर निर्णय घेत होते, तसे निर्णय मीही घेईन’- राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुनेत्रा पवारांचा नेत्यांना अप्रत्यक्ष इशारा
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

मुंबई- “कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर मी त्याची दखल घेईन. दादा ज्याप्रमाणे कठोर निर्णय घेत होते, तसे निर्णय मीही घेईन”, असे सांगत राष्ट्रवादीच्या अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचक इशारा दिला आहे. त्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. दिवंगत नेते अजित पवार यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर, संघटन विस्तारावर आणि कार्यकर्त्यांनी घ्यावयाच्या भूमिकेवर विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाच्या प्रमुख या नात्यानं सुनेत्रा पवार यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले.
भाषणादरम्यान अजितदादांचा उल्लेख होताच त्यांच्या पत्नी तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गहिवरून आले. काही क्षण त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळाले. सभागृहातील वातावरणही यावेळी भावनिक झाले होते. पण, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या हस्तक्षेपाबद्दल भाष्य केलं.
“यापूर्वी जे घडलं ते मी पाहिलं आणि समजून घेतलं आहे. दादांनी सगळ्यांना मान-सन्मान दिला. पदं दिली. मात्र, यापुढे मी पक्षाच्या हिताला प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर मी त्याची दखल घेईन. दादा ज्याप्रमाणे कठोर निर्णय घेत होते, तसे निर्णय मीही घेईन. अधिक जागृतपणे काम करा. मला कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही, अशीच अपेक्षा आहे”, असे सांगत सुनेत्रा पवार यांनी कठोर पवित्रा घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
महामंडळांच्या नियुक्त्या करताना पक्षासाठीचे समर्पण आणि त्याग यांचा विचार केला जाईल. आपण सर्वजण मिळून निर्णय घेऊ. गुणवत्ता, पक्षासाठीचे योगदान आणि पक्षवाढीसाठी केलेले काम याला महत्त्व दिलं जाईल. केवळ किती वर्षे काम केले? यापेक्षा त्या काळात पक्ष किती वाढला याचा विचार केला जाईल. काही लोकांना पक्षवाढीसाठी सोबत घेताना त्यांचा योग्य सन्मान करावा लागतो. आपल्या विचारांशी आपण कधीही तडजोड केली नाही. यापुढेही केली जाणार नाही, याची मी ग्वाही देते-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापनदिन सोहळ्यात पक्षाच्या वाटचालीपेक्षा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यांचीच अधिक चर्चा रंगली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर मिश्कील टोले लगावताना तटकरे यांनी त्यांच्या राजकीय शैलीचं कौतुकही केले. यामुळे पक्षाच्या वाटचालीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बोलताना तटकरे यांनी भुजबळ यांच्या ‘मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धीबळाचा नाही’ या विधानाचा उल्लेख करत त्यावर भाष्य केले.
छगन भुजबळ हे केवळ कबड्डीचे खेळाडू नाहीत..!- “छगन भुजबळ हे केवळ कबड्डीचे खेळाडू नाहीत, तर ते उत्तम कलाकार आणि निर्मातेही आहेत. कबड्डीच्या खेळात त्यांनी अनेक खेळाडूंना बाद केलं आहे. शिवसेनेत असताना त्यांनी दोन वेळा महापौरपद मिळवले. त्यावेळी त्यांनी कोणाला ‘चेकमेट’ केले होते?” असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला. “आपल्या पक्षात सर्व प्रकारचे खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू अजितदादांनी तयार केले आहेत,” असेही ते म्हणाले.
राज्यसभेच्या जागेवरून छगन भुजबळ हे नाराज होते. राज्यसभेत जाण्याची त्यांची इच्छा असताना राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी नाराज झालेल्या भुजबळांनी मी बुध्दीबळाचा नाही तर कबड्डीचा खेळाडू आहे असं विधान केलं होतं. त्याचबरोबर तटकरे कुटुंबाला जो न्याय मिळतो तो आम्हाला का नाही? असा सवाल उपस्थित केला होता. यामुळे सुनिल तटकरे यांनी केलेल्या टोलेबाजीची चर्चा रंगली.
याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून सुनिल तटकरे आणि पार्थ पवार यांच्यात अंतर्गत कलह दिसून येत होता. यावेळी पार्थ पवार हे व्यासपीठावर होते. अजित पवारांनी आतापर्यंत कश्या पद्धतीनं काम केले हे सांगताना पार्थ पवारांना उद्देशून तटकरेंनी काही गोष्टींचा उल्लेख केला. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत पार्थ पवारांचं कौतुक केलं.
2004 सालचा तो निर्णय चुकला…? दरम्यान, 2004 च्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना तटकरे म्हणाले की, “त्यावेळी काँग्रेसकडून अधिक जागा मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न झाले होते. विदर्भात राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री ठरवण्याची पद्धत असती, त्यावेळी आपलाच मुख्यमंत्री झाला असता.” 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना तटकरे यांनी तो ‘पहाटेचा शपथविधी’ नसल्याचा दावा केला. “त्या काळात सोबत राहिलो असतो, तर पुढे वेगळे चित्र दिसले असते,” असे ते म्हणाले.
अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय ‘छातीवर दगड ठेवून’ घेतल्याचे सांगत तटकरे यांनी त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केले. “लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे विधानसभेत यश मिळाले. त्यांनी विधानसभा निवडणुकीत 72 टक्के स्ट्राइक रेट नोंदवला,” असे तटकरे म्हणाले. टीका-टिप्पणी होत राहणार असली तरी पक्षाची वाटचाल सुरूच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रोहीत पवारांवर अप्रत्यक्ष टीका? – यानंतर तटकरे यांनी 2019 मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत टीकाकारांवर निशाणा साधला. “आज आमच्यावर गद्दारीची आणि भाजपासोबत जाण्याची टीका केली जाते. मात्र, 2019 मध्ये अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाचे सर्व आमदार एकत्र बसले होते. त्यावेळी भाजपासोबत सत्तेत सहभागी व्हावे, अशी भूमिका मांडणारे पत्र तयार करून ते शरद पवार यांना देण्यात आले होते. त्या पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या होत्या,” असा दावा त्यांनी केला. “आज टीका करणाऱ्यांनी इतिहास आठवावा. त्या पत्रावर सर्वप्रथम सही कुणाची होती, याचाही शोध घेतला पाहिजे. आता तो कागद बाहेर काढण्याची वेळ आली आहे,” असेही तटकरे म्हणाले.
सुनेत्रा पवार यांचा रोख कुणाकडं?2019 मध्ये अजित पवार यांनी घेतलेला निर्णय कायम राहिला असता, तर महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण पूर्णपणे वेगळे दिसले असते, असे मतही तटकरे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण आणि 2019 मधील घडामोडींवरील चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत दिल्यानंतर त्यांचा रोख कुणाकडे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

