जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या आरोपावरून अमरावती महापालिकेत गोंधळ; चक्क बुलेटप्रूफ जॅकेट घालून किरीट सोमैय्या बैठकीला हजर!
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या हे चक्क बुलेटप्रुफ जॅकेट घालून अमरावती महापालिकेच्या बैठकीला हजर राहिले. आचारसंहितेच्या काळात ते बैठकीला आल्यानं मोठा गोंधळ झाला.

अमरावती – जन्म प्रमाणपत्र प्रकरणात अमरावती महापालिकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी गुरुवारी महापालिकेत येऊन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना झालेल्या या बैठकीवरून शिवसेना (यूबीटी) आणि एआयएमआयएमच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतल्यानं महापालिक परिसरात मोठा गोंधळ झाला. विशेष म्हणजे, किरीट सोमैय्या हे चक्क बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून महापालिकेत दाखल झाले. त्यांनी बैठकीलाही बुलेटप्रूफ जॅकेट घालूनच उपस्थिती लावली.
पोलिसांच्या सूचनेमुळं घातलं बुलेटप्रूफ जॅकेट- महापालिकेत आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमैय्या म्हणाले,” मी बुलेटप्रूफ जॅकेट का घातलं, हे सध्या सांगू शकत नाही. पोलिसांच्या सूचनेनुसार मी ते परिधान केलं आहे”, असे किरीट सोमैय्या म्हणाले. या महापालिकेत आले असताना महापालिकेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला.
बैठकीवरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा –सोमैय्या यांच्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एआयएमआयएमच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध दर्शविला. काही एमआयएम नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या जालना बाहेर पोहोचून बैठकीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखलं. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानं वातावरण अधिक तापलं. पोलिसांनी यावेळी राशिद अली या नगरसेवकाला ताब्यात घेतल्यानंतर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
महापालिकेच्या आवारात शिवसेना (यूबीटी) आणि एआयएमआयएमच्या नगरसेवकांनी किरीट सोमैय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना महापालिका परिसरातून बाहेर काढलं. एआयएमआयएमच्या सात नगरसेवकांना ताब्यात घेऊन राजापेठ पोलीस ठाण्यात हलविण्यात आलं.
आचारसंहितेचा भंग नसल्याचा सोमैय्यांचा दावा – बैठकीला उपस्थित झालेल्या आक्षेपांबाबत किरीटसमय्या यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले फेब्रुवारी 2025 मध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या बाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीनंतर सुरू असलेल्या चौकशीची माहिती घेण्यासाठी ही भेट होती. घोटाळ्याची चौकशी, त्यासंदर्भातील माहिती संकलन आणि प्रशासकीय प्रक्रियेचा आढावा घेणं याचा निवडणूक आचारसंहितेची काहीही संबंध नाही. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी माझी भेट किंवा बैठक आचारसंहितेचा भंग ठरत नाही असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं.
अमरावतीची परिस्थिती गंभीर – जन्म प्रमाणपत्र प्रकरणाबाबत बोलताना किरीट सोमय्या यांनी अश अमरावतीची परिस्थिती गंभीर असल्याचा दावा केला. अमरावती जन्म प्रमाणपत्रांसाठी आलेल्या सुमारे 4 हजार 800 अर्जांपैकी सर्व अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तसेच सीआरएस पोर्टल वरील नोंदीनुसार 2025 मध्ये अमरावती तब्बल 35 हजार दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत हा आकडा 19 हजार आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात सर्वाधिक दुरुस्त्या अमरावती झाल्या असून हा प्रकार गंभीर आहे असं सोमय्या म्हणाले.
राज्यभर मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन लाख जन्म प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर नवीन प्रकार समोर आल्याचा दावा किरीटसमय्या यांनी केला. नावातील स्पेलिंग दुरुस्ती किंवा किरकोळ बदलांच्या नावाखाली अनेक महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र जारी करण्यात आली आहेत. हा प्रकार सर्वप्रथम मुंबई महापालिकेत समोर आला. तिथं 87 हजार 364 प्रमाणपत्रांची तपासणी सुरू असून आतापर्यंत 31 हजार संशयास्पद प्रकरण आढळली आहेत असा आरोप किरीट समय यांनी केला.
अमरावती चाळीस हजाराहून अधिक प्रमाणपत्रांची तपासणी-अमरावती महापालिकेत 2025 मध्ये 3 हजार 541 आणि 2026 मध्ये 5, हजार 693 अशी 39 हजारहुन अधिक जन्म प्रमाणपत्रांशी संबंधित नोंदी करण्यात आल्या. यापैकी किमान 25 हजार प्रकरणांमध्ये संशयास्पद दुरुस्त्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महापालिका आयुक्त, महापौर आणि जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली असून पुढील पंधरा दिवसात सर्व प्रकरणांची सविस्तर पडताळणी करण्यात येणार असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
99 टक्के प्रकरण संशयास्पद- नाव दुरुस्तीच्या नावाखाली 20,30 आणि 40 वर्ष वयोगटातील व्यक्तींच्या नोंदणी मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या प्रकरणांपैकी 99 टक्के प्रकरण संशयास्पद वाटत आहेत. त्यामुळे राज्य सरकार कठोर भूमिका घेणार असून सामूहिक कारवाई करण्यात येईल असा दावा किरीट समय यांनी केला.
आचारसंहितेत बैठक कशी ?- किरीट सोमय्या यांच्या महापालिकेतील बैठकीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक संजय गव्हाळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू असताना एका माजी खासदाराला महापालिकेत बैठक घेण्याचा अधिकार कोणी दिला ? महापालिका प्रशासनांना याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी संजय गव्हाळे यांनी केली. अमरावतीतील वातावरण बिघडवण्याचा काम वारंवार केलं जात आहे. शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निवडून आलेले नगरसेवक सक्षम आहोत. बाहेरून येऊन वातावरण दुसरी करण्याची गरज नाही असेही संजय गव्हाळे म्हणाले.
एआयएमआयएमच्या नगरसेवकांना महापालिकेत प्रवेश नाकारला – आचारसंहिता सुरू असताना किरीट सोमय्या अमरावतीत का येत आहेत असा प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारला होता. महापालिका आमची असून आम्ही निवडून आलेले नगरसेवक आहोत. तरी आम्हालाच महापालिकेत जाण्यापासून रोखण्यात आलं आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा पुरविण्यात आली अशी टीका एआयएमआयएम चे नगरसेवक मुनस्सर आली पत्रकारांशी बोलताना केली. महापालिकेत जन्म प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना त्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
- गेल्या तीन वर्षापासून जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याविषयी माजी खासदार किरीट सोमैय्या हे मुंबई, नांदेड, मालेगावसह विविध महापालिका प्रशासनाकडं पाठपुरवठा करत आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिका अंतर्गत कथित बेकायदेशीररित्या 87 हजार 347 जन्म प्रमाणपत्राबाबत एसआयटी चौकशी होणार आहे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे.

