ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘नीट’, ‘सीबीएसई’ पेपरफुटीविरोधात एनएसयूआय आक्रमक; मशाल मोर्चा

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी अमरावतीः ‘नीट’ आणि ‘सीबीएसई’ परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनेविरोधात अमरावतीमध्ये काँग्रेस, युवक काँग्रेस आणि एनएसयूआय संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या गंभीर प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता शहरातील ईर्विन चौकातून एका भव्य ‘मशाल मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी यावेळी सर्व आंदोलकांनी एकमुखाने केली. या भव्य मशाल मोर्चाचे नेतृत्व ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांनी केले.दिवस-रात्र मेहनत करून अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका यावेळी नेत्यांनी मांडली. हातामध्ये मशाली घेतलेले काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि शेकडो संतप्त विद्यार्थी इर्विन चौकातून मुख्य मार्गाकडे मार्गस्थ झाले, तेव्हा संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मशाल मोर्चाचा समारोप झाला.

या आंदोलनात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, निलेश गुहे, संकेत कुलट यांच्यासह ‘एनएसयूआय’चे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप, कडक पोलीस बंदोबस्त

या मशाल मोर्चामध्ये केवळ अमरावती शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पेपरफुटीमुळे भविष्याची चिंता लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रशासनाविरोधातील तीव्र संताप स्पष्टपणे दिसून येत होता. मोर्चा दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी गाडगेनगर पोलिसांच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्य मार्गावरून काढण्यात आलेला हा मशाल मोर्चा शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला. या मोर्चात युवकांची गर्दी लक्षणीय ठरली. एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष या मोर्चात सहभागी झाल्यामुळे काँग्रेसने शक्तीप्रदर्शन केले, हे विशेष

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.