महाराष्ट्र

खोलापूर-म्हैसपुर विकासकामांची सीईओ सत्यम गांधींकडून पाहणी; गुणवत्तापूर्ण सुविधांवर भर

भातुकली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी भातकुली तालुक्यातील खोलापूर व म्हैसपुर गावांना भेट देऊन विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, घरकुल योजना व ग्रामविकासाशी संबंधित कामांचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
खोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देत त्यांनी आरोग्य सेवा, वैद्यकीय सुविधा व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. दवाखान्यातील सर्व उपकरणे व संगणकीय यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासोबतच औषध वितरण आणि कार्यालयीन कामकाज अधिकाधिक ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरोग्य केंद्राच्या छत दुरुस्तीसह इन्व्हर्टर, वातानुकूलित ऑपरेशन थिएटर व आधुनिक मॉड्युलर ओटी उभारणीसाठी आवश्यक सहकार्य करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आशा कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र बैठक हॉल उभारण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

अंगणवाडी केंद्राची पाहणी करत बालकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच गावातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला बचत गटांनी दुग्ध उत्पादनावर आधारित उद्योग सुरू करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील एनक्यूएएस पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले.

यानंतर म्हैसपुर येथे ग्रामपंचायत भवनात नागरिकांशी संवाद साधत विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. जिल्हा परिषद शाळा व आरओ पाणी शुद्धीकरण केंद्राची पाहणी करून सुविधांची तपासणी करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या घरी भेट देत घरकुल बांधकामांची पाहणी करण्यात आली. घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यासह नागरिकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या क्षमतेचा शोषखड्डा उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.