महाराष्ट्र

मतदार जागृतीची ज्योत पेटली… अंजनगाव सुर्जीमध्ये पथनाट्याचा लोकशाही संदेश

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
लोकशाहीची मुळे अधिक भक्कम व्हावीत, जागरूक नागरिकत्वाची मशाल प्रत्येकाच्या हाती पहुँचावी यासाठी निवडणूक आयोगाच्या स्वीप उपक्रमांतर्गत अंजनगाव सुर्जी येथे मतदार प्रबोधनाचा सुंदर संगीतरंग साकारला. श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकासोबत तहसील कार्यालय व पंचायत समिती यांनी बालाजीनगर व काठीपुरा परिसरात प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीईओ सुधीर खोडे तर प्रमुख उपस्थितीत बीडीओ जायभाये, स्वीप नोडल अधिकारी सालोडे, विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर, स्वीप टीम सदस्य संदीप खंडारे, प्रमोद दखने, राहुल रोकडे, रवींद्र कान्हेरकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नितीन घोडीले आदी मान्यवर होते.

उद्गारांत गटविकास अधिकारी जायभाये यांनी नागरिकांना मतदानाचे अधिष्ठान समजावले. “मतदान हा केवळ अधिकार नाही; तो प्रामाणिक नागरिकत्वाचा श्वास आहे… राष्ट्रहिताच्या या यज्ञात आपली उपस्थिती आवश्यक आहे,” असे आवाहन त्यांनी करताना उपस्थितांशी हितगूज साधले.
बीईओ सुधीर खोडे यांनीही प्रलोभनांपासून मुक्त राहून सजग, विवेकी उमेदवार निवडण्याचे सामर्थ्य मतदारांच्या हातात असल्याची जाणीव करून दिली.

या जनजागृती उपक्रमाची खरी आत्मा मात्र पथनाट्यातून प्रकट झाली. राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी सादर केलेले “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” हे पथनाट्य प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेले. दिव्या मालधुरे, श्रुतिका सुरजुसे, सुनाक्षी टाले, अभिषेक धर्मे, तेजस्विनी ताथोड, गायत्री भगत, अमित धारपवार, ईश्वरी रोहनकर, आदित्य तायडे, ऋतुजा अडगोकार व ईश्वरी येवले या विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकशाहीचे महत्व प्रत्येकापर्यंत पोहोचवले.

रासेयो स्वयंसेवकांनी काठीपुरा, पान अटाई, जयस्तंभ चौक अशा विविध ठिकाणी पथनाट्य प्रयोग सादर करून सभोवती लोकशिक्षणाची चेतना जागवली.

या संपूर्ण उपक्रमात संत गाडगेबाबा विचार वाटिका, महिला बचत गट, पंचायत समिती, नगरपरिषद, तसेच रासेयो अधिकारी ममता येवतकार, अनिकेत भुयार, नविता मालाणी व स्वयंसेवक अविनाश वानखडे, तृप्ती खरात, अजय लव्हाळे, प्रतीक्षा पवार, क्षितिजा जैन आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाची सुंदर सांगता संदीप खंडारे यांनी आभारप्रदर्शनाने केली.
अंजनगाव सुर्जीच्या रस्त्यांतून उमटलेले हे पथनाट्य केवळ कलात्मक नव्हते… ते लोकशाहीच्या कण्याला बळकटी देणारे प्रेरणागीत होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.