चिखलदऱ्यात अस्वलांची मध्यरात्रीची धिंगाणा सफर; बसस्थानक ते चोरबगीचा परिसर थरथरला

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) चिखलदरा : थंड हवेचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात बुधवारी रात्री नेहमीची शांतता एका अनपेक्षित पाहुण्यांनी भंग केली. रात्री आठच्या सुमारास दोन अस्वलांनी गावाच्या हद्दीत प्रवेश करताच परिसरात अक्षरशः खळबळ माजली. क्षणभरातच ‘अस्वल… अस्वल…!’ अशी हाकाटी गावभर पसरली आणि पर्यटकांपासून गावकऱ्यांपर्यंत सर्वांच्या अंगावर काटा आला.
देवी पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गावर हे अस्वल प्रथम दिसले. काहींनी आवाज करून हुसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु अस्वलांची उधळण आणखीनच अनियंत्रित होत बसली. सैरावैरा धावत ते पाहणी नाक्यावर पोहोचले. निवडणूक ताफ्यातील तपासणी नाक्यावर तैनात कर्मचाऱ्यांनाही परिस्थिती समजून न सुटता धांदल उडाली. तरीही अस्वल काही जागेवरून हलत नव्हते.
क्षणाक्षणाला वाढणाऱ्या धास्तीमुळे नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा जमाव बसस्थानक परिसरात एकवटला. बूथवरील काम सोडून अनेक कार्यकर्ते देखील त्या दिशेने धावत पोहोचले. आरडाओरड, काठ्या आपटणे, वाहनांचे हॉर्न— अशा सर्व प्रयत्नांनी अखेरीस अस्वलांनी चोरबगीचा दिशेने कूच केली. गावाच्या हद्दीतून ते जंगलाकडे परत वळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अर्धा तास सुरू राहिलेल्या या धिंगाण्याने चिखलदऱ्यातील रात्रीची शांतता धुळीस मिळवली; तर नागरिकांनी वनविभागाने तातडीने सतर्कता वाढवावी, अशी मागणीही व्यक्त केली.

