जेएनपीए बंदरात ३९ पाकिस्तानी कंटेनर जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई, ९ कोटींचा माल ताब्यात
जेएनपीए बंदरात ३९ पाकिस्तानी कंटेनर जप्त करण्यात आले. यातून ९ कोटींचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.

नवी मुंबई – दुबई, युएई यासारख्या देशांद्वारे होणारी पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट ही मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत १११५ मेट्रिक टन माल वाहून नेणारे ३९ कंटेनर जप्त करण्यात आले. या मालाची किंमत अंदाजे ९ कोटी रुपये आहे. यामधून पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतुकीवर सरकारने लागू केलेल्या आयात धोरणाच्या अटी आणि निर्बंधांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत आहे. आयात करणाऱ्या फर्मच्या भागीदारांपैकी एकाला २६ जुन रोजी अटक करण्यात आली आहे. डीआरआयच्या मुंबईतील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातून आयात वस्तूंवर बंदी – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानातून येणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा पारगमनावर व्यापक बंदी घातली आहे. यापूर्वी अशा वस्तूंवर २०० टक्के सीमा शुल्क आकारले जात होते. या कडक उपाययोजना करूनही, काही आयातदार मालाच्या उत्पत्तीची चुकीची घोषणा करून आणि संबंधित शिपिंग कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारी धोरणाला डावलण्याचा प्रयत्न करतात. जेएनपीएच्या बंदरावर हे सामान जप्त करण्यात आलं. या मालाचे मूळ पाकिस्तान असल्याचे लपवून, ते संयुक्त अरब अमिरातीमधून आल्याचे खोटे घोषित करण्यात आले होते. मात्र तपासात असे दिसून आले की, हा माल प्रत्यक्षात पाकिस्तानातून आला होता, आणि तो केवळ दिशाभूल करण्यासाठी दुबई मार्गे भारतात पाठवला होता. तपासात असे दिसून आले की सुरुवातीला हा माल कंटेनर आणि जहाजांवरून पाकिस्तानातून दुबईला नेण्यात आला आणि नंतर तो भारताकडे जाणाऱ्या दुसऱ्या कंटेनर आणि जहाजांवर हलवण्यात आला.
कागदपत्रांचे विश्लेषण केल्यावर मालाच्या प्रवासाचा मार्ग उघडकीस – मालाची अधिक तपासणी आणि आतापर्यंत केलेल्या तपासादरम्यान गोळा केलेल्या कागदपत्रांचे विश्लेषण केल्यावर या मालाच्या प्रवासाचा मार्ग उघडकीला आला आहे. हा माल पाकिस्तानच्या कराची बंदरातून निघाला आणि दुबईतील जबेल अली बंदरावर तो भारताकडे जाणाऱ्या जहाजांवर चढवण्यात आला. त्याशिवाय, पाकिस्तानी संस्थांबरोबर झालेले पैशांचे हस्तांतरण झाल्याचे उघड झाले आहेत. ज्यामुळे अवैध आर्थिक व्यवहारांबाबत चिंता निर्माण झाली आहे. या संपूर्ण व्यवहाराची पद्धत पाकिस्तानी आणि युएईच्या नागरिकांबरोबरच्या गुंतागुंतीच्या व्यवहारांद्वारे आखली गेली. ज्याचा उद्देश मालाचे खरे मूळ, पाकिस्तान आहे, हे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

