सहा केंद्रांवर १ हजार ५११ डॉक्टरांनी दिली ‘नीट-पीजी’; ४७ परीक्षार्थी गैरहजर
परीक्षेदरम्यान अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त

अमरावती : एमबीबीएसनंतर वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट-पीजी’ प्रवेश परीक्षा रविवारी शहरातील सहा केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी १,५५८ उमेदवार पात्र होते. त्यापैकी १,५११ उमेदवारांनी
परीक्षा दिली, तर ४७ उमेदवार विविध कारणांमुळे परीक्षेला अनुपस्थित राहिले. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार किंवा अनुचित घटना घडली नाही.
राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या (एनबीईएमएस) वतीने घेण्यात येणारी नीट-पीजी ही देशातील वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची एकल पात्रता-सह-प्रवेश परीक्षा आहे. एमबीबीएस पदवी आणि आवश्यक इंटर्नशिप पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना या परीक्षेच्या माध्यमातून एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी
स्पर्धा करता येते. देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत या परीक्षेचा निकाल आणि क्रमवारी महत्त्वाची ठरते. नीट पीजी परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा पार पडली. उमेदवारांना तब्बल तीन तास ३० मिनिटांत २०० बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे होते. प्रत्येक प्रश्नाला ४ गुण अशी एकूण ८०० गुणांची ही परीक्षा होती. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त परीक्षा केंद्रावर होता. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर त्रिज्येत अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास बंदी होती. केवळ परीक्षार्थी, परीक्षा कर्तव्यावरील कर्मचारी आणि शासनमान्य व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला.
एमबीबीएसच्या अभ्यासक्रमावरच भर नीट-पीजीसाठीविद्यार्थ्यांना अॅनाटॉमी, फिजिऑलॉजी, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी, फार्माकॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, फॉरेन्सिक मेडिसिन, कम्युनिटी मेडिसिन यांसारख्या मूलभूत आणि पॅरा-क्लिनिकल विषयांसोबतच जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, प्रसूती व स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, रेडिओलॉजी, अॅनेस्थेशिया आणि ऑर्थोपेडिक्स आदी क्लिनिकल विषयांचा अभ्यास करावा लागतो.
या केंद्रावर झाली परीक्षा शहरातील विभागीय क्रीडा संकुलातील प्रोबीटी इन्फोटेक, माधव इन्फोटेक, आयओएन डिजिटल झोन आयडीझेड, कठोरा, आयओएन डिजिटल झोन आयडीझेड युनिव्हर्सिटी कॅम्प एरिया, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आयओएन डिजिटल झोन आयडीझेड, सिटीलँड या सहा ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते.

