ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“शेम ऑन यू फडणवीस”, अमरावती रुग्णालयातील दुर्घटनेनंतर सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

अमरावती रुग्णालय दुर्घटनेवरून शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी 'शेम ऑन यू फडणवीस' म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र प्रहार केला.

अमरावती : “नवनीत राणा यांच्या हनुमान टेकडीसाठी सरकार 121 कोटी रुपये देऊ शकतं, मात्र त्या हनुमान टेकडीपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक असलेले 9 कोटी रुपये देऊ शकत नाही, हा सरकारच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे,” असा घणाघात शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. “राणांच्या हनुमान टेकडीसाठी 121 कोटी आणि गरिबांच्या मुलांचे प्राण वाचवणाऱ्या रुग्णालयासाठी 9 कोटी नाहीत?” असा प्रश्न उपस्थित करत, “शेम ऑन यू फडणवीस, शेम ऑन यू” अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत तीव्र टीका केली.

”फडणवीस सरकार महाराष्ट्राला लागलेला कलंक”

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला ‘महाराष्ट्राला लागलेला कलंक’ म्हटलं होतं, ते चुकीचं नसल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. ‘गरीब मुलांचा जीव गेला, या घटनेची चौकशी काय होईल याबाबत मला फारशी अपेक्षा नाही,’ अशी टीका त्यांनी केली. चौकशी समितीचे अध्यक्ष संजय काटकर रुग्णालयात दुपारपर्यंत भेटले नाहीत, असा आरोप करत ‘ते नेमके कुठे आहेत?’ असा सवाल त्यांनी केला.

 

”चौकशी समितीचे अध्यक्ष राणांच्या घरी चहापाण्यासाठी गेलेत का?”

“चौकशी समितीचे अध्यक्ष संजय काटकर नवनीत राणा यांच्या घरी चहापाण्यासाठी गेले असतील का?”, असा उपरोधिक सवाल करत सुषमा अंधारे यांनी चौकशी प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “चौकशी निष्पक्षपणे होणं आवश्यक असून संबंधित अधिकाऱ्यांनी पीडितांच्या प्रश्नांना सामोरे गेलं पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली.

आरोग्य विभाग शिंदे शिवसेनेकडं, म्हणून राजकारण…

आरोग्य विभाग एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडं असल्यानं त्यांच्यावर खापर फोडण्यासाठी राजकारण केलं जात असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. “कुरघोडीच्या राजकारणात सत्ताधारी गुंतले आहेत, मात्र या राजकारणात गरिबांच्या मुलांचे जीव का पणाला लावले?”, असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केला.

”पालकमंत्र्यांना माहिती होती मग निधी का दिला नाही?”

रुग्णालयातील प्रलंबित कामांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. पावसाळ्यात रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. रेन हार्वेस्टिंगसह विविध कामांची प्रमाणपत्रं आणि प्रलंबित कामांबाबत प्रश्न विचारण्यात आले; मात्र अनेक कामं निधीअभावी प्रलंबित असल्याचं उत्तर प्रशासनाकडून मिळाल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. ही कामं जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणार असतील, तर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना त्याची माहिती होती का? त्यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती का?’ याबाबत चौकशी केली असता, पालकमंत्र्यांना हे सारं काही ठाऊक होतं, असं असतानाही त्यांनी निधी दिला नसल्याबाबत सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केला.

”पालकमंत्र्यांना मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे”

 

“चंद्रशेखर बावनकुळे यांना आता मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे लागले आहेत का?”, असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. “फडणवीस केंद्रात गेल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळावी, यासाठी आवश्यक त्या राजकीय हालचाली करण्यात बावनकुळे व्यस्त आहेत”, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.

”बावनकुळे घेत आहेत राजस्थानमध्ये पाणीपुरीचा आस्वाद”

“आपली जबाबदारी असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला असताना, राजस्थानमध्ये प्रचारासाठी गेलेले चंद्रशेखर बावनकुळे हे तिथं पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे, पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ ते समाजमाध्यमांवर प्रसारित करत आनंद घेताना दिसतात. रीलचं आयुष्य जगणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना रिअल आयुष्याशी काही देणंघेणं नाही”, अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली.

सुरक्षा धोक्यात असल्याचं पत्र आधीच दिलं होतं…

“रुग्णालयातील आधीच्या पार्श्वभूमीवर फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या उपायोजनांबाबत पूर्वीच पत्रव्यवहार झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. ‘जिल्हा शल्य चिकित्सकांनी बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात व्हेंटिलेटर कार्यरत नसल्याचं, फायर ऑडिट तातडीनं करण्याची गरज असल्याचं आणि दुर्घटना घडल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहील, असं स्पष्ट नमूद केलं असल्याचं पत्र उपलब्ध आहे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “ज्या वॉर्डमध्ये दुर्घटना घडली तो वॉर्ड सुरक्षित नव्हता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना होती; असं असतानाही त्यांनी त्या ठिकाणी लहान बाळांना ठेवलं, हा त्यांचा गुन्हा आहे”, असं देखील सुषमा अंधारे म्हणाल्या. “या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तसेच स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करणाऱ्या संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली.

”बच्चू कडू आता बच्चूंना वाचवणार की आरोग्यमंत्र्यांना”

“राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. ‘बच्चू कडू आता काही बोलणार नाहीत, आंदोलन करणार नाहीत; कारण त्यांच्या पक्षाचा आता आरोग्यमंत्री आहे. ते छोट्या छोट्या बच्चूंना पाहणार की आरोग्यमंत्र्याला वाचवणार?”, असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. “ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं धोरण बच्चू कडू यांनी स्वीकारलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारकी दिली असल्यानं आता शिंदे शिवसेना पक्षातील मंत्र्यांना वाचवण्याची जबाबदारी बच्चू कडूंवर असल्याचं दिसतं”, अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली.

गरिबांच्या लेकरांच्या मृत्यूवर राजकारण नको…

“सरकारी रुग्णालय हे कोणत्याही पक्षाचं नसतं, तिथं उपचारासाठी येणारे रुग्णही कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या प्रश्नावर पक्षीय राजकारण न करता तातडीनं प्रलंबित कामं पूर्ण करून रुग्णालय सुरक्षित करावं”, अशी मागणी देखील सुषमा अंधारे यांनी केली.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.