बडनेऱ्यात दारूच्या अड्ड्यावर भरदुपारी रक्तरंजित थरार; एकाची निघृण हत्या
एक गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती, पोलिसांचा रुग्णालयासमोर बंदोबस्त

बडनेरा येथील नव्या वस्तीतील आठवडी बाजार परिसरातील एका देशी दारूच्या दुकानात जुन्या वादातून झालेल्या खुनी संघर्षाने संपूर्ण शहर हादरले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी बडनेरा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी तेथे मोठा जमाव एकत्र आला. त्यामुळे पोलिसांना मोठी कुमक तैनात करावी लागली. शेख कासिम शेख शकील (वय २४, रा. गुलिस्तानगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे. तो बडनेऱ्यात आपल्या मावशीकडे आला होता. रविवारी दुपारी तो आणि जखमी शोएब शहा ऊर्फ गुड्डू (वय २०, रा. नवी वस्ती, बडनेरा) हे दोघे आठवडी बाजारातील देशी दारू दुकानात गेले होते. तिथे काही जणांसोबत त्यांचा वाद टोकाला गेला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चार ते पाच जणांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला.
‘त्या’ खासगी रूग्णालयाला पोलिस छावणीचे स्वरुप
जखमी शोएबला सुरुवातीला अमरावतीच्या बडनेरा रोड स्थित एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता, तिथे त्याच्या समर्थकांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला. आता या दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची कसून छाननी केली जात असून, नेमका घटनाक्रम कसा घडला याचा पोलिस शोध घेत आहेत.
एक संशयित ताब्यात देशी दारू दुकानाचीही काही प्रमाणात नासधूस झाली. तर दुसरीकडे बडनेरा रोडवरील खासगी रुग्णालयात अनेकांनी धाव घेतल्याने त्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले. दरम्यान ज्या एकाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले, तो दारू गुत्त्यावरील कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती भागात उघडपणे शस्त्रांचा वापर करून खून होत असल्यामुळे गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे, हा मोठा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी घटनेची माहिती मिळताच बडनेऱ्यात एकच खळबळ उडाली. पोलिस उपायुक्त प्रांजली सोनवणे, सहायक पोलिस आयुक्त नयन अलुरकर आणि ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश दहातोंडे व अतुल वर तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक लॅब आणि डॉग स्क्वॉडलाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली आहे. दरम्यान याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

