महाराष्ट्र

अंधश्रद्धेच्या सावटाला छेद; डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम

विद्यार्थ्यांशी रात्रभर संवाद साधत अधिकाऱ्यांनी दिला आत्मविश्वासाचा मंत्र; ‘अंधश्रद्धेला थारा न देता आयएएस-आयपीएस होण्याचे स्वप्न पाहा’

अमरावती (प्रतिनिधी): मेळघाटातील आदिवासी समाजाच्या धाडसी परंपरेला शिक्षणाची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड मिळाली, तर या मातीतून असंख्य अधिकारी घडू शकतात, असा विश्वास जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोमा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. आश्रमशाळेत कथित ‘भुतां’च्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट आश्रमशाळेत मुक्काम करून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. प्रशासनाच्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन अधिकाऱ्यांनी पालकत्वाची भूमिका निभावत दिलेला हा धाडसी संदेश सध्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

 

चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, डोमा येथे मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी हा आगळावेगळा उपक्रम पार पडला. आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला आणि उपविभागीय अधिकारी किसन तडवी यांच्यासह तालुका प्रशासनातील अधिकारी आश्रमशाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती केवळ शब्दांनी दूर करण्याऐवजी स्वतः त्यांच्यासोबत राहून प्रशासनाने अंधश्रद्धेविरोधातील लढ्याला कृतीची जोड दिली.

 

भगवान बिरसा मुंडा आणि तंट्या भिल्ल यांसारख्या क्रांतिकारी योद्ध्यांची परंपरा लाभलेला आदिवासी समाज संकटांना घाबरणारा नाही. मेळघाटच्या जंगलात वाघ-अस्वलांसारख्या वन्यप्राण्यांशी दोन हात करण्याचे धैर्य असलेल्या समाजातील विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेच्या भीतीपुढे मात्र झुकता कामा नये, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. भीतीवर विश्वास ठेवण्याऐवजी विज्ञानावर विश्वास ठेवा, शिक्षणाला जीवनाचे साधन बनवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत मोठी स्वप्ने पाहा, असा संदेश त्यांनी दिला.

 

अधिकाऱ्यांसोबतच्या गप्पांत उलगडली यशाची वाट

 

विद्यार्थ्यांसोबत भोजन करताना अधिकाऱ्यांनी औपचारिकतेचा बुरखा बाजूला ठेवत अगदी मित्राप्रमाणे संवाद साधला. ‘मित्रांगण कट्टा’वर झालेल्या या गप्पांमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासापासून प्रशासकीय सेवेत पोहोचण्यापर्यंत अनेक प्रश्न विचारले. आयएएस आणि आयपीएस अधिकारी होण्यासाठी नेमकी तयारी कशी केली, अडचणी कोणत्या आल्या, विद्यार्थी दशेतच भविष्यातील ध्येय निश्चित करता येते का, अशा प्रश्नांना अधिकाऱ्यांनी आपल्या अनुभवांतून उत्तरे दिली.

 

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आपल्या शालेय जीवनातील प्रसंग सांगताना एका आयएएस अधिकाऱ्याच्या भेटीने आपण प्रभावित झालो आणि त्याच काळात प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय मनाशी बाळगले, असा अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. ध्येय लहानपणीच निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश मिळवता येते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजविला.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आणि सहायक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनीही आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव सांगितले. बी.ए.सारखी पदवी घेतल्यानंतरही कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर सनदी सेवेत पोहोचता येते, याचे उदाहरण त्यांनी स्वतःच्या प्रवासातून विद्यार्थ्यांसमोर ठेवले. ‘आम्ही घडलो, तुम्हीही घडा’ हा संदेश या संवादातून विद्यार्थ्यांच्या मनावर ठसला.

 

अंधश्रद्धेविरोधात थेट प्रबोधन

 

आश्रमशाळेतील कथित भुतांच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेल्या भीतीला छेद देण्यासाठी विज्ञाननिष्ठ विचारांची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही अफवा किंवा अंधश्रद्धेला बळी न पडता प्रत्येक घटनेकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. प्रसिद्ध खंजिरीवादक संदीपपाल महाराज यांनीही विद्यार्थ्यांसह पालकांचे अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन केले.

 

दरम्यान, अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींसाठी उभारण्यात आलेल्या नवीन वसतिगृहाची पाहणी करून त्याचे उद्घाटन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत केलेले भोजन, रात्रभर साधलेला संवाद आणि भीतीऐवजी आत्मविश्वासाची पेरणी करण्याचा केलेला प्रयत्न यामुळे डोमा आश्रमशाळेतील हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी कायमचा प्रेरणादायी ठरला.

 

“जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासारखे वरिष्ठ अधिकारी आमच्यात येऊन आमच्याशी बोलले. आमच्या मनातील भीती दूर करून आम्हाला आत्मविश्वास दिला. मनावर ताबा ठेवून त्याला योग्य दिशा दिली, मेहनत केली तर आपणही मोठे अधिकारी होऊ शकतो, हा त्यांनी दिलेला विश्वास आयुष्यभर उपयोगी पडेल,” अशी भावना इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कल्याणी गोपीचंद जावरकर हिने व्यक्त केली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.