महत्वाचे

वाघिणीची दहशतः मजुर, शेतकरी हबकले; सीमेवरील गावे भयग्रस्त

मोर्शी : सध्या खरीपातील कोळपणी, निंदण आणि फवारणीसारखी महत्त्वाची शेतीकामे वेगाने सुरू आहेत. मात्र, बोर अभयारण्यातून बाहेर पडलेल्या नरभक्षक वाघिणीच्या वाढत्या दहशतीमुळे वरूड आणि मोर्शी भागातील शेतकरी, शेतमजूर शेताकडे जाण्यासही धजावत नसल्याचे भयंकर चित्र आहे.

वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमावर्ती शिवारात वाघिणीने चरणदास ईखे यांच्या नरडीचा घोट घेतला, ती अंगावर काटा आणणारी घटना पाहून दोन्ही जिल्ह्यांच्या वेशीवरील हजारो शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चरणदास ईखे यांच्या मृत्यूने परिसर हादरला. भांबोरा (ता. मोर्शी) शिवारात गुरुवार, २७ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास चरणदास ईखे हे शेतात काम करत होते. मात्र, दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक त्यांच्यावर झडप घालून त्यांचा जीव घेतला. त्यांच्या थरारक अंताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वरूड, मोर्शी, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या चारही तालुक्यांतील सीमावर्ती गावांना हायअलर्टचा फटका बसला आहे. ‘पुढचा नंबर कोणाचा?’ या भीतीने गावेच्या गावे हादरली आहेत.

मजूर मिळेनात; शेतीकामे संकटात पावसाच्या उघडिपीनंतर सध्या पिकांना खते देणे आणि डवरणीची कामे वेगाने उरकण्याची घाई शेतकऱ्यांना लागली आहे. मात्र, या नरभक्षक वाघिणीच्या भीतीने शेतमजुरांनी शेतात जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांसमोर आता रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे हाताशी आलेले पीक मजुरांअभावी आणि वाघाच्या भीतीपोटी शेतातच पडून राहण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

वन विभागासमोर मोठे आव्हान अवघ्या नऊ दिवसांत तळेगाव ते थेट मोर्शी असा लांबचा प्रवास करणारी ही दोन ते अडीच वर्षांची वाघीण चलाख असल्याने वन विभागाच्या पथकांना हुलकावणी देत आहे. वन्यजीव विभागाला या वाघिणीचा माग काढणे कठीण झाले आहे. चरणदास ईखे यांच्या बळीनंतर आता वन विभागाने केवळ कॅमेरे न लावता, या नरभक्षक वाघिणीला तात्काळ जेरबंद करण्यासाठी विशेष रेस्क्यू टीम आणि शूटर तैनात करावेत, अशी आर्त हाक सीमावर्ती भागातील ग्रामस्थ देत आहेत.

 

मृत शेतकरी इखे यांच्या कुटुंबियांना आज पाच लाखांचे दोन धनादेश प्रदान करण्यात आले आहे. उर्वरित १५ लाखांचा धनादेश वारसाच्या नावाने बाँडस्वरुपात त्यांच्या नावे जमा करण्यात येणार आहे.

योगिता मगर, वनपरिक्षेत्र अधिकारी मोर्शी

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.