महाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानधन वाढ व शासकीय दर्जासाठी धरणे आंदोलन

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयासमोर आज अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन पार पडले. केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.
१२ फेब्रुवारी रोजी देशभरात पुकारण्यात आलेल्या संपाच्या समर्थनार्थ बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी सहभाग नोंदवला. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शुभम बाळापुरे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलकांनी कामगारहिताच्या मागण्यांसाठी एकजूट दर्शवत शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये किमान वेतन २१,००० रुपये निश्चित करणे, मदतनिसांचे मानधन १५,००० रुपये करणे, अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा प्रदान करणे, पेन्शन योजना लागू करणे, ग्रॅज्युटीचा लाभ देणे तसेच प्रोत्साहन भत्ता त्वरित वितरित करणे यांचा समावेश होता. याशिवाय ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत सेविकांनी भरलेल्या अर्जांप्रती ५० रुपये मानधन तातडीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी ठोस मागणीही आंदोलकांनी केली.
या आंदोलनात ललिता पखान, प्रमिला भांबुरकर, सारिका ज्ञानदेव धामोळे, अर्चना राऊत, कल्पना काकड, छाया शेंडे, स्मिता कांडलकर, माधुरी मानकर, वर्षा सरोदे, संगिता कुले, प्रीती चोपडे यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. सर्वांनी शांततामय मार्गाने आंदोलन करत शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका मांडली.

दरम्यान, संबंधित मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.