महसूल पथकाला चकवा देत रेतीने भरलेला ट्रक पसार
पाठलाग, अडथळे आणि रस्त्यावर रेतीचा सडा- अवैध वाहतुकीचा धक्कादायक प्रकार

–सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :तालुक्यात अवैध रेती वाहतुकीचा संशय असलेली धक्कादायक घटना आज पहाटे उघडकीस आली असून महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान संशयित ट्रक चालकाने अधिकाऱ्यांना चकवा देत पळ काढल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास परतवाडा येथून अंजनगावकडे येणाऱ्या एका ट्रकवर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय महसूल विभागाच्या पथकाला आला. उत्सव नाका परिसरात पथकाने वाहन थांबवण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन न थांबवता वेग वाढवून पुढे काढल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाठलाग सुरू केला आणि नवीन बसस्थानक परिसरात ट्रक थांबवण्यात यश मिळाले.
ग्राम महसूल अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चालकाकडे रेती वाहतुकीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असता ती समाधानकारक नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वाहन तहसील कार्यालयात आणण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालकाने वाहन तहसीलकडे नेत असल्याचे सांगून पुन्हा ट्रक पुढे नेला. त्याचवेळी मागून आलेल्या एका कारने महसूल कर्मचाऱ्यांच्या वाहनासमोर येत अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या गोंधळाचा फायदा घेत ट्रकच्या मागील बाजूचे फलक उघडण्यात आल्याने शहानूर नदी पुलापासून तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेती सांडल्याचे सांगितले जाते. रस्त्यावर रेतीचा थर साचल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला तसेच काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याचेही दिसून आले.
घटनेनंतर महसूल विभागाने तातडीने यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर सांडलेली रेती हटवून पंचनामा केला. संबंधित प्रकरणात संशयित ट्रक चालक तसेच एका कारमधील काही व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या प्रकारानंतर अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचे समजते.

