महाराष्ट्र

जागतिक एड्स दिनानिमित्त अमरावतीचा लाल संदेश : आरोग्यजागृतीची भव्य रॅली

अमरावती : अमरावती शहर आज जागतिक एड्स दिनानिमित्त जागरूकतेच्या संदेशांनी दुमदुमले. सामाजिक बांधिलकी आणि आरोग्यभान यांचा संगम घडवत शहरात ‘भव्य एड्स जनजागृती रॅली’चे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले. ‘अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एड्सला लढा देऊ’ या प्रेरणादायी घोषवाक्याने भारलेले वातावरण; अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयातून झाली. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालक डॉ. विनोद कंदेवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जनसमुदायाला मार्गदर्शन करताना त्यांनी अमरावती जिल्ह्याने एचआयव्ही संक्रमणाचा दर कमी करण्यास केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. “सर्वसमावेशक जनजागृती आणि सामूहिक सहकार्यामुळे एचआयव्ही निर्मूलनाकडे वाटचाल शक्य होते,” असे त्यांनी नमूद केले.

रुग्णालयातून निघालेली जनजागृती रॅली रेल्वे कॉटन मार्केट, राजकमल चौक, श्याम चौक मार्गे पुन्हा इर्विन चौकातून रुग्णालयात परतली. वैद्यकीय, नर्सिंग, समाजकार्य, कृषी, अभियांत्रिकी अशा विविध विभागांतील विद्यार्थ्यांचा उत्साह लक्षवेधी ठरला. उच्च-जोखमीच्या गटांपर्यंत माहिती पोहोचवणाऱ्या सामाजिक संस्थांचे ‘माहिती रथ’ही रॅलीचे आकर्षण बनले. यातून समुपदेशन, प्रतिबंध उपाय आणि उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रॅलीला विशेष उर्जा लाभली. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत अमरावतीतून उमटलेला हा जनजागृतीचा आवाज समाजाला सुरक्षित, जागरूक आणि उत्तरदायी आरोग्याकडे नेणारा ठरला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.