सुवर्णहक्क प्रत्येकापर्यंत : जिल्हा प्रशासनाचा आरोग्यक्रांतीचा संकल्प

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती : सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेला बळ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्ड नोंदणीची महाअभियान मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. “आरोग्यसेवा प्रत्येकाच्या दारी पोहोचलीच पाहिजे” या ध्येयवाक्याला अधोरेखित करत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या उपक्रमाला स्पष्ट दिशा दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या मोहिमेबाबत सविस्तर चर्चा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, आयुष्मान योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले तसेच जिल्ह्यातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी आशा सेविकांच्या कार्याची दखल घेत त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. येथेपासून कार्ड नोंदणीसाठी आशांना 20 रुपये आणि कार्ड वितरणासाठी 10 रुपये मानधन देण्यात येणार आहे. “प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचलीच पाहिजे. आशा सेविका हे या मोहिमेचे हृदय आहेत,” असे सांगत त्यांनी सर्वांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
आगामी दोन दिवसांत सर्व आशा सेविकांचे लॉगिन आयडी सक्रिय करण्यात येणार असून, संपूर्ण डिसेंबर महिन्यात गावागावांत विशेष नोंदणी मोहीम राबविली जाणार आहे. नोंदणीला गती देण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्याही आशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहकार्यातून ही मोहीम गावपातळीवर प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 51 मान्यताप्राप्त रुग्णालयांत या कार्डच्या आधारे पूर्णपणे नि:शुल्क उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे शिधापत्रिकेतील नाव अद्ययावत करणे हा या योजनेचा पहिला टप्पा असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील गोल्डन कार्ड नोंदणीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा सेविका— निता खंदेझोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयश्री देवळे, पंची दहिकर, काजल साम्बरकर, सीमा सोनोने, गीता गावंडे, इंदिरा मोहोड, कल्पना मेश्राम, शेषकन्या थोरात आणि सुनिता चौरकर — यांना जिल्हाधिकारी येरेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

