ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

शिधापत्रिकेवरील शिक्का अस्सल अन् स्वाक्षरी बनावट ?

'डीएसओं'द्वारा चौकशीचे आदेश, 'ती' स्वाक्षरी नेमकी कुणाची असेल ?

चांदूर बाजार: तालुक्यातील कुन्हा देशमुख येथील एका कुटुंबाला मिळालेल्या रेशनकार्डावर पती, मुलगा व मुलगी यांच्या नावापुढे दोन वेगळ्या जाती व तिसऱ्यात ‘इतर’ असा उल्लेख आहे. तालुका पुरवठा विभागाच्या या अनागोंदी कारभाराविरोधात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ही बाब गंभीरतेने घेत याबाबत चौकशी करण्याचे पत्र तहसीलदार व निरीक्षक यांना दिल्याची माहिती आहे.

सुधीर वरघट यांच्याकडील शिधापत्रिका २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अद्ययावत करण्यात आली. त्यामध्ये ५२ वर्षीय सुधीर वरघट, त्यांची मुलगी रूपल (२०) व मुलगा हेमंत (१४) यांची वर्गवारी अनुसूचित जाती, मोठी मुलगी सृष्टी (२२) ही इतर मागास वर्गाची, तर कुटुंबप्रमुख असलेल्या वैशाली सुधीर वरघट (४५) यांच्या नावापुढे ‘इतर’ असा उल्लेख असल्याचे ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यावर या प्रकाराची तालुक्यात चर्चा होत आहे. दरम्यान, तत्कालीन तहसीलदार यांनी सदर रेशनकार्डवरील सही नाकारली आहे. त्यामुळे तहसीलदारांकरिता सही व शिक्का व ‘त्या’ कुटुंबाला तीन जातींत विभागणारी शिधापत्रिका चांदूर बाजार तहसीलमधून कोणी दिली, हा प्रश्न समोर आला आहे.

वरघट कुटुंबीयांसमोर अनंत अडचणी

तहसील कार्यालयातील चुकीच्या दाखल्यामुळे सुधीर वरघट यांच्या कुटुंबीयांना, विशेषतः

महाविद्यालयीन वयाच्या मुर्लीच्या शैक्षणिक, नोकरी तसेच शासकीय अनुदानात मोठी अडचण निर्माण होत आहे. महसूल विभागाचा चुकीचा भुर्दंड मात्र सामान्य कुटुंबाला सोसावा लागत आहे. त्यामुळे या प्रकाराला कारणीभूत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी वरघट परिवाराने केली आहे.

 

वरघट कुटुंबीयांकडील प्रमाणपत्राची चौकशी करून दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल.

सोनल सूर्यवंशी, तहसीलदार, चांदूर बा.

तहसीलदारकरिता ‘ती’ सही कुणाची ?

तहसीलदार सोनल सूर्यवंशी यांनी प्रमाणपत्रावर शिक्क्यानिशी असलेल्या तहसीलदारकरिता असलेल्या स्वाक्षरीविषयी विचारणा केली असता, त्यांनी ती स्वाक्षरी तत्कालीन तहसीलदारांची व संबंधित पुरवठा निरीक्षकांची नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे मग तहसीलदारकरिता अधिकार नसताना कोणी स्वाक्षरी केली, याचा शोध पुरवठा विभाग घेणार का, असा नागरिकांचा सवाल आहे.

बोगस प्रमाणपत्रांचा महसूल विभाग घेणार का शोध ?

चांदूर बाजार तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र तसेच शिधापत्रिका तयार करून देणारे अनेक दलाल किंबहुना रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आहे. तहसीलदारांचा अस्सल शिक्का व बनावट सही किंवा करिता स्वाक्षरी असलेली अशी किती प्रमाणपत्रे वितरित केली गेली, याचाही शोध घेणे आता महसूल विभागाला क्रमप्राप्त आहे.

 

चांदूर बाजार येथील पुरवठा निरीक्षक व तहसीलदार यांना चौकशी व आवश्यक कारवाईसाठी पत्र दिले आहे.

निनाद लांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.