ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अदानींच्या साम्राज्याचा नकाशाच राज ठाकरेंनी मांडला; ‘१० वर्षांत काय वाढलं?’ यावर केला गौप्यस्फोट

 

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदानी समूहाच्या वाढत्या साम्राज्यावर धक्कादायक माहिती उघड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतरच्या १० वर्षांत अदानी समूहाचा विस्तार कसा झाला, याचा ‘ग्राफ’च राज ठाकरे यांनी मांडला असून, मुंबईच्या विमानतळाबाबत त्यांनी व्यक्त केलेली भीती मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणारी आहे.

‘अदानींचा विकास मोदींच्या उदयासोबतच’ राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिलेल्या संयुक्त मुलाखतीत अदानी समूहावर थेट निशाणा साधला. त्यांनी रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील फरक स्पष्ट करताना म्हटले की, “अंबानी हे नरेंद्र मोदी सत्तेत येण्याआधीपासूनच मोठे उद्योगपती होते. मात्र, गौतम अदानी यांचा खरा विस्तार मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे पंतप्रधान झाल्यानंतरच झाला आहे.” राज यांनी दावा केला की, २०१४ मध्ये अदानींचे किती प्रकल्प होते आणि २०२४ मध्ये ते कोठवर पोहोचले आहेत, याचा अभ्यास केल्यास धक्कादायक माहिती समोर येते.

मुंबई विमानतळाबाबत मोठा दावा राज ठाकरे यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भविष्याबाबत अत्यंत गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या मते, नवी मुंबईत जे नवीन विमानतळ उभे राहत आहे, तिथे टप्प्याटप्प्याने मुंबईतील सर्व कार्गो आणि प्रवासी वाहतूक हलवली जाईल. एकदा का सर्व ऑपरेशन्स नवी मुंबईला शिफ्ट झाली की, मुंबईच्या सध्याच्या विमानतळाची प्रचंड मोठी जागा मोकळी होईल.

राज ठाकरे म्हणाले, “सध्याच्या मुंबई विमानतळाची जागा इतकी मोठी आहे की त्यात शिवाजी पार्कसारखी किमान ५० मैदाने सहज सामावू शकतील. ही मोकळी झालेली जमीन नंतर ‘विकायला’ काढली जाईल आणि तिथे मोठे कमर्शियल प्रोजेक्ट्स उभे राहतील, असा त्यांचा दावा आहे.”

‘देश विकायला काढलाय’ या मुलाखतीत राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत म्हटले की, “आपल्या पायाखालून काय सरकवलं जातंय, याचा लोकांना पत्ताच नाहीये. बंदरे, विमानतळे, वीज प्रकल्प आणि आता धारावीसारखे प्रकल्प एकाच व्यक्तीच्या घशात घातले जात आहेत.” त्यांनी असा आरोप केला की, हे सर्व धोरणबद्ध पद्धतीने सुरू असून, मुंबई आणि महाराष्ट्रातील महत्त्वाची संपत्ती ठराविक उद्योगपतींच्या हाती सोपवली जात आहे.

या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.