इंडियन आयडल’ फेम प्रशांत तामांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; संदीप आचार्य यांच्यानंतर आणखी एका विजेत्याचा दुर्दैवी अंत

नवी दिल्ली: प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ सीझन ३ चा विजेता आणि अभिनेता प्रशांत तामांग (Prashant Tamang) याचे रविवारी (११ जानेवारी २०२६) निधन झाले. वयाच्या ४३ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Cardiac Arrest) त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांतच्या अशा अचानक जाण्याने संगीत आणि मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तामांग दिल्लीतील जनकपुरी येथील आपल्या राहत्या घरी होता. रविवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. प्रशांतच्या निधनाची बातमी त्याचे मित्र आणि इंडियन आयडलमधील सहस्पर्धक अमित पॉल आणि कपिल थापा यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. प्रशांत हा मूळचा दार्जिलिंगचा होता आणि इंडियन आयडल जिंकणारा तो ईशान्य भारतातील पहिला स्पर्धक ठरला होता.
पोलीस कॉन्स्टेबल ते सुपरस्टार प्रशांत तामांगचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी होता. तो कोलकाता पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. २००७ मध्ये ‘इंडियन आयडल’च्या तिसऱ्या पर्वात त्याने भाग घेतला आणि आपल्या आवाजाच्या जादूने संपूर्ण देशाचे प्रेम जिंकले. विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने संगीत क्षेत्रासोबतच अभिनय क्षेत्रातही नशीब आजमावले. त्याने ‘गोरखा पल्टन’ यांसारख्या नेपाळी चित्रपटांमध्ये काम केले होते.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या वेब सीरिज ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमध्ये (Paatal Lok 2) प्रशांतने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच, सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle of Galwan) या चित्रपटातही तो झळकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी गीता थापा आणि मुलगी असा परिवार आहे.
संदीप आचार्य यांची आठवण झाली ताज्या प्रशांत तामांगच्या निधनामुळे ‘इंडियन आयडल’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता संदीप आचार्य (Sandeep Acharya) याच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. संदीप आचार्य याचे २०१३ मध्ये वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी काविळीमुळे (Jaundice) निधन झाले होते. संदीप हा मुळचा राजस्थानचा होता. इंडियन आयडलच्या इतिहासातील दोन लाडक्या विजेत्यांचे अशा प्रकारे तरुण वयात निधन झाल्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रशांत तामांगच्या निधनावर शोक व्यक्त केला असून, “प्रशांतच्या जाण्याने आपण एक गुणी कलाकार गमावला आहे,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

