मेळघाटातील महिला–बाल आरोग्यासाठी ‘परिक्रमा’ उपक्रम; तज्ज्ञ डॉक्टर महिन्यातून एकदा गावात

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अमरावती: मेळघाटातील दुर्गम भागात महिला व बालकांच्या आरोग्यस्थितीत शाश्वत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासनाने ‘मेळघाट परिक्रमा’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत दर महिन्याला एक दिवस तज्ज्ञ डॉक्टर थेट मेळघाटातील गावांमध्ये उपलब्ध होणार असून, खासगी वैद्यकीय क्षेत्राने या सेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वॉर रूम बैठकीत सामाजिक व आरोग्यविषयक योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह शहरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी येरेकर यांनी मेळघाटातील आरोग्यविषयक आव्हाने मांडत, आतापर्यंत राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे माता व बालमृत्यूदरात घट झाल्याचे नमूद केले. मात्र दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी नियमित तपासणी, वेळेवर निदान आणि उपचार अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी शासनाच्या माध्यमातून महिला व बालरोग तज्ज्ञांची उपलब्धता वाढविण्यात येणार आहे.
महिला व बालकांना संतुलित व पौष्टिक आहार मिळावा यासाठी कृषि विज्ञान केंद्र व एकात्मिक बाल विकास विभागाच्या सहकार्याने विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. पोषणमूल्य वाढविण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त आहाराचा समावेश करण्यावर भर देण्यात येणार आहे.
याशिवाय ११ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये किडणीसंबंधी आजारांचे लवकर निदान करण्यासाठी विशेष तपासणी मोहिम हाती घेण्यात येणार असून, आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या भागांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. रक्तसंसर्ग प्रतिबंध, कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामस्तरीय समित्यांच्या नियमित बैठका घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
आरोग्यासोबतच नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दुग्धव्यवसायाला चालना देणे, दूध प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देणे, मोहफुल संकलन व प्रक्रिया उद्योगातून स्थानिकांना उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी शीतवाहन, मोहफुल सुकविण्यासाठी ड्रायर व आवश्यक साहित्य पुरविण्यात येणार आहे.
मेळघाटातील दुर्गम भागांमध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्क अखंडित ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. या सर्वसमावेशक उपाययोजनांमुळे मेळघाटातील आरोग्य व विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

