भारतीय संस्कृतीतच जगाच्या शांततेचे सूत्र – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : भारताने प्राचीन काळापासून जगाला मार्गदर्शन केले आहे. आजही अनेक देश भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा अभ्यास करून आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत. सनातन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्म असून, संपूर्ण विश्वात शांतता नांदवण्याची क्षमता केवळ भारतीय संस्कृतीत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले.
सकल हिंदू समाज मंच, दर्यापूर यांच्या वतीने गुरुवारी सायंकाळी स्वातंत्र्य सेनानी वा. का. धर्माधिकारी जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मंचावर प्रदीप मलिये व सागर महाराज परिहार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शर्मा यांनी केले, तर संचालन अॅड. अजिंक्य धर्माधिकारी यांनी केले.
कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत देशात अनेक बदल झाले आहेत. हे बदल राज्यकर्त्यांनी नव्हे, तर जनतेच्या जागृतीतून घडले आहेत. जगातील सर्व धर्म सारखे असू शकत नाहीत, परंतु भारतीय संस्कृतीचा विचार संपूर्ण जगात आपला ठसा उमटवत आहे.”
ते म्हणाले, “भारतीय संविधान आणि धर्म यांबाबत काहीजण खोटे नेरेटिव्ह तयार करून संभ्रम निर्माण करत आहेत. हा डाव उधळून लावण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांची आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “आजच्या संगणक युगात सत्य जाणून घेणे सहज शक्य आहे; मात्र सोशल मीडियावर अवलंबून राहिल्यामुळे भारतीयांनी वाचन संस्कृती विसरली आहे. परिणामी खरा इतिहास जनतेपासून लपवला जात आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने वाचनाची सवय लावून षड्यंत्रांपासून सावध राहिले पाहिजे.”
या व्याख्यानाला महिलांसह पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मंचावर सजविलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विशेष आकर्षण ठरली. कार्यक्रमाची सांगता ‘शिव वंदना’ स्तुतीने करण्यात आली.

