अंजनगाव सुर्जीचे मुख्याध्यापक अनिल जुनघरे यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक दीपस्तंभ असतो, याचे प्रत्यंतर देत सीताबाई संगई प्राथमिक शाळा, अंजनगाव सुर्जी येथील मुख्याध्यापक अनिल केशवराव जुनघरे यांना राज्य शासनाचा 2024-25 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
मुंबई येथील टाटा थिएटरमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय दिमाखदार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, विधान परिषद सदस्य जयंतराव अभ्यंकर, आमदार मनीषा कायंदे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, तसेच शिक्षण संचालक महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक जुनघरे यांनी आपल्या शाळेत आधुनिक अध्यापन पद्धती, उपक्रमशीलता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा यशस्वी समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या यशाबद्दल अंजनगाव सुर्जी व परिसरात आनंद व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

