अंजनगाव सुर्जी येथे विविध संघटनांतर्फे प्रविण गायकवाड यांच्या हल्ल्याचा निषेध

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेली शाईफेक आणि भ्याड हल्ल्याचा आज, बुधवारी येथे सर्वपक्षीय निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान तहसीलदार यांना निवेदन देत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
प्रवीण गायकवाड हे फुले, शाहु, आंबेडकर महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचवण्याचे कार्य करतात. बहुजन समाजातील युवक स्वावलंबी कसा बनेल, यासाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे. हे बहुजनविरोधी लोकांना आवडले नाही. त्यामुळे साथीदारांनी एकत्र येत प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करत भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला. या घटनेचा निषेध सार्वत्रिक स्तरावरून होत असताना त्याचे पडसाद अंजनगाव सुर्जी येथेही उमटले.
आंदोलनादरम्यान तहसीलदार पुष्पा सोळंके (दाबेराव) यांना तालुक्यातील पुरोगामी विचारणीच्या संघटना, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, आदी संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. या वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद दाळू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा सीमा बोके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदीप येवले, सप्त खंजेरीवादक संदिपपाल महाराज, रामपाल महाराज, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्रा. प्रेमकुमार बोके, शिवसेना (उबाठा) विकास येवले, महेश खारोडे, प्रवीण पेटकर, मिर्झा झहीर बेग, राजेश शिंगणे, रोहित कान्हेरकर, पवन रायबोले, डॉ. विशाल देशमुख, भाऊराव वानखडे, संजय वाघुळे, स्मिता घोगरे, विद्या अरबट, रजनी काळमेघ, हर्षा चहाटे उपस्थित होते.

