प्रेमविवाहानंतर ४ महिन्यांतच करुण अंत; पत्नीला दोन तरुणांसोबत रंगेहात पकडल्याचा पतीचा दावा, गळा दाबून केली हत्या

प्रेमविवाहानंतर ४ महिन्यांतच करुण अंत;
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या चार महिन्यांतच एका २२ वर्षीय विवाहितेची तिच्या पतीने निर्घृण हत्या केली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हत्येनंतर आरोपी पतीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली.
नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूरमधील महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘न्यू हाय-टेक सिटी कॉलनी’मध्ये घडली. आरोपी पती सचिन सिंह भदौरिया (वय २४) आणि मृत श्वेता सिंह (वय २२) हे मूळचे फतेहपूरचे रहिवासी होते. चार महिन्यांपूर्वी दोघांनी घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ ते सुरत (गुजरात) येथे राहिले आणि त्यानंतर कानपूरला परतले. सचिन येथे रिक्षा चालवण्याचे काम करत होता.
सचिनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयाची खात्री करण्यासाठी त्याने शुक्रवारी (दि. १७) रात्री आपण घरी येणार नसल्याचे पत्नीला सांगितले होते. मात्र, तो अचानक रात्री घरी पोहोचला.
रात्रीचा थरार आणि पोलीस हस्तक्षेप पीटीआय (PTI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सचिन जेव्हा अचानक घरी पोहोचला, तेव्हा त्याला घरात पत्नीसोबत शेजारी राहणारे दोन तरुण आढळले. यामुळे त्यांच्यात मोठा वाद झाला. यावेळी पोलिसांच्या ‘डायल ११२’ वर कॉल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक चौकशीनंतर सर्वांना समज देऊन सोडले.
मात्र, पोलीस गेल्यानंतर पती-पत्नीमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. आरोपी सचिनच्या म्हणण्यानुसार, पत्नीने त्या दोन तरुणांशी संबंध ठेवण्याबाबत आणि त्यांच्यासोबत राहण्याबाबत हट्ट धरला. या रागाच्या भरात सचिनने श्वेताची गळा दाबून हत्या केली.
हत्येचा उलगडा हत्येनंतर सचिनने पत्नीचा मृतदेह एका ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि घराला कुलूप लावून बाहेर पडला. वृत्तानुसार, घटनेनंतर सुमारे ४ तास तो शहरात इकडे-तिकडे भटकत होता. अखेर शनिवारी सकाळी त्याने महाराजपूर पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.
हुंडाबळीचा आरोप दुसरीकडे, मृत श्वेताच्या कुटुंबीयांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. श्वेताचे वडील राजकुमार सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सासरच्या मंडळींनी १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपायुक्त (पूर्व) सत्यजित गुप्ता यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

