अंजनगाव सुर्जीत उबाठा शिवसेनेत खळबळ; अक्षय गवळी यांनी फोडली अंतर्गत गोंधळाची पोल

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जीच्या राजकीय घडामोडींमध्ये आज मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जोरदार हादरा बसला आहे. शिवसेना उबाठा युवा सेना शहरप्रमुख अक्षय गवळी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षश्रेष्ठींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
आज दुपारी १२ वाजता स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत अक्षय गवळी यांनी आपल्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी त्यांनी पक्षातील निर्णयप्रक्रिया, अंतर्गत कारभार आणि स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल २५ दिवसांनी उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेना उबाठाकडे संख्याबळ असतानाही उपाध्यक्षपद न स्वीकारता भाजपाला पाठिंबा देण्यात आल्याने आधीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या.
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून वाद-
स्वीकृत नगरसेवक पदासाठी अक्षय गवळी, राजेंद्र टांक, राजेंद्र पाटील आणि पंकज मोदी यांनी अर्ज दाखल केले होते.
पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला अक्षय गवळी यांनाच स्वीकृत नगरसेवक करण्याबाबत सकारात्मक संकेत दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलत पंकज मोदी यांची निवड झाल्याने वाद निर्माण झाला आणि नाराजी उफाळून आली.‘प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष’ असा आरोप पत्रकार परिषदेत बोलताना अक्षय गवळी यांनी केला.
“पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची योग्य दखल घेतली जात नाही. या प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाले असावेत, अशी शंका निर्माण होते,” असा दावा केला. तसेच, “राजकारणात काम करताना प्रामाणिकपणासोबत आर्थिक स्थैर्यही आवश्यक असल्याचा अनुभव आला,” असेही ते म्हणाले.
या प्रकरणामागे नेमका कोणाचा हस्तक्षेप आहे, असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत थेट नावे घेणे टाळत, “याची उत्तरे पक्षातील वरिष्ठांनीच द्यावीत,” अशी प्रतिक्रिया दिली.
-उबाठा शिवसेनेत गळतीचे संकेत?
या राजीनाम्यानंतर अंजनगाव सुर्जीत शिवसेना उबाठा गटात अंतर्गत नाराजी अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या घटनेमुळे पक्षाला आणखी फटका बसेल का, स्थानिक पातळीवर मोठी गळती लागेल का, याबाबत राजकीय जाणकारांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
एकूणच, आरोप-प्रत्यारोप, नाराजी आणि नेतृत्वावरील प्रश्नांमुळे अंजनगाव सुर्जीच्या राजकारणात नव्या वादळाची नांदी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

