पिण्यास पाणी मिळेना तरी अख्खं गाव पिकवतंय टोमॅटो; गावाची प्रेरणादायी वाटचाल
जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर खडकाळ भागातही सोनं पिकवून दाखवू शकतो. त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट....

अहिल्यानगर : सातत्यानं दुष्काळाचा सामना, पाण्याची भीषण टंचाई आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहणं, अशा अनेक संकटांना तोंड देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पठार भागातील पिंपळगाव देपा हे गाव आज टोमॅटो शेतीचं यशस्वी मॉडेल बनलं आहे. हे ऐकून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडला असेल की, जिथं प्यायला पाणी नाही, तिथं टोमॅटो शेती कशी काय शक्य झाली? चला तर पाहू या खरा संवादच्या या स्पेशल रिपोर्टमधून पिंपळगाव देपा गावाची प्रेरणादायी वाटचाल….
पाणी टंचाई असतानाही टोमॅटोची शेती : संगमनेर तालुक्यातील पठार भाग म्हणजे पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष असलेला प्रदेश. खडकाळ जमीन असल्यानं पावसाचं पाणी वाहून जातं. त्यामुळं उन्हाळ्यात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागतात. वर्षानुवर्षं दुष्काळाचा सामना करणाऱ्या या पिंपळगाव देपा गावातील सर्वच शेतकरी शेतात टोमॅटोचं पीक घेतात आणि वर्षाकाठी लाखोंचं उत्पन्नही मिळवत आहेत. पठार भागातील अनेक गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, या गावातील शेतकऱ्यांनी कोणाकडं बोट न दाखवता स्वतः पुढं येत पावसाचं पाणी शेततळ्यात साठवलं आणि त्या पाण्याचं योग्य नियोजन करत ठिबक सिंचनाचा वापर करून टोमॅटोची शेती सुरू केली. हळूहळू अख्खं गावच टोमॅटो शेतीत यशस्वी मॉडल झालंहे. या गावातील शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन पठार भागातील गुजाळवाडी, मुधोळवाडी, खंडेराववाडी यांसारख्या अनेक वाड्यांतील शेतकरीही आता टोमॅटो शेती करू लागले आहेत.

शेतकरी घेतात लाखोंचं उत्पन्न : पठार भागात खडकाळ माळरान असल्यानं पारंपरिक शेती करणं अवघड होतं. कारण पारंपरिक शेतीला पाणी अधिक लागतं. त्यामुळं कमी पाण्यावर आणि कमी कालावधीत निघणारं टोमॅटो पीक पिंपळगाव देपा गावातील शेतकऱ्यांना अधिक सोयीचं वाटलं. आता या गावात वर्षातील हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूंमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते आणि शेतकरी लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. पुणे, नाशिक या बाजारपेठा जवळ असल्यामुळं शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी नेणंही सोयीचं होतं आणि दरही चांगला मिळत असल्याचं टोमॅटो उत्पादक शेतकरी बाळासाहेब भागवत यांनी सांगितलं.

पाणी आडवा, पाणी जिरवा’ : पावसाचं पाणी साठवून ठेवणं. उन्हाळ्यात ते योग्य वापरणं आणि वातावरणाचा योग्य अभ्यास करून टोमॅटो शेती करणं यामुळंच आज पिंपळगाव देपा परिसरातील शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली न थांबता नवं पर्व घडवत आहेत. या भागातील शेतकरी शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण करत असून, संपूर्ण राज्यातील शेती क्षेत्रासाठी त्यांचं हे काम प्रेरणादायी ठरत आहे. खडकाळ जमिनीतून हिरवळ निर्माण करणं ही केवळ कष्टाची नव्हे तर दूरदृष्टीचीही साक्ष आहे. पिंपळगाव देपाचे शेतकरी आजही ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या मंत्राच्या आधारे शेतीत उज्वल भविष्यासाठी वाटचाल करत आहेत.


