ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

काँग्रेसच्या बंडखोर नेत्या भाजपात दाखल, जयश्रीताई पाटलांचा चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत भाजपात प्रवेश

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश मुंबईत होणार आहे.

सांगली- काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या सांगलीच्या वसंतदादा घराण्यातील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून आणि काँग्रेस बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटलांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सांगलीत औपचारिक पक्ष प्रवेश सोहळा पार पडलाय. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जयश्री पाटील यांचा पक्षप्रवेश मुंबईत होणार आहे.

त्या स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी : जयश्रीताई पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष असून, त्या स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा आदेश डावलून जयश्रीताई पाटलांनी विशाल पाटलांचा जाहीर प्रचार केला होता. त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत जयश्रीताई पाटलांनी विधानसभेची निवडणूकदेखील लढवली होती. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात होतं, त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून जयश्रीताई पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आला होते. यानंतर जयश्रीताई पाटील कोणत्या पक्षात जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, राष्ट्रवादी अजित पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह होता, मात्र भाजपाने जयश्रीताई पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलंय.

काँग्रेसला सांगली महापालिकेत मोठे खिंडार : सांगलीत जयश्रीताई पाटील यांच्या घरी जाऊन मंत्री चंद्रकांत पाटलांनी जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा करीत त्यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब करत औपचारिक पक्षप्रवेश उरकून घेतलाय. जयश्रीताई पाटलांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला सांगली महापालिकेत मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा एक मोठा गट जयश्रीताई पाटील यांना मानणार आहे, हा गट जयश्रीताई पाटील यांच्यासोबतच भाजपात प्रवेश करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.