ओढ्याच्या पुरात वाहून गेल्याने माय-लेकीसह पुतणीचा मृत्यू!
नांदेड : नांदेडच्या हदगाव तालुक्यात अवकाळी पावसाने बामणी फाटा, मनाठा, वरवट परिसरात कहर केला आहे. 27 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मनाठा, वरवट परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात वरवट गावाजवळ असलेल्या पुलावरून आई, मुलगी आणि पुतणी गावाकडे जात असताना ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तिघींचाही मृत्यू झाला आहे. या घटनेतील तिघींचाही मृतदेह सापडला असून, वरवटसह परिसरात शोककळा पसरली आहे.
तहसीलदार नांदे, मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुने घटनास्थळी दाखल!
मंगळवार 27 मे रोजी 1 वाजताच्या दरम्यान वरवट येथील अरुणा बळवंत शकिरगे (35), दुर्गा बळवंत शकिरगे (8), अंकिता विजय शकिरगे (8) ह्या आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मोठा पाऊस सुरु झाल्याने भरपावसात त्या आपल्या घराकडे जाऊ लागल्या. गावालगत असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले होते. त्या पुल ओलांडून आपल्या घराकडे जात असताना तिन्ही जणी त्या पुरात वाहून गेल्या. त्यांचा शोध घेतला असता प्रथम दुर्गाचा मृतदेह सापडला. त्यानंतर पुढे चुंचा आणि वरवट शिवारातील नाल्यात अरूणा आणि अंकिता यांचा मृतदेह सापडला आहे.
या घटनेची माहिती मिळताच हदगावच्या तहसीलदार नांदे, मंडळ अधिकारी, तलाठी, मनाठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुने हे घटनास्थळी दाखल झाले होते. लगेच तहसीलदार नांदे यांनी नांदेड येथून अग्निशमक पथकाला पाचारण करून शोध मोहीम वरवट ते चिखली, फुटाना-चुंचा या ओढ्यामध्ये शोध मोहीम सुरू केली होती.
वाहून गेल्यानंतर 25 मिनिटीत ओसरला ओढ्याचा पूर!
तिन्ही मायलेकी वाहून गेल्यानंतर, ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी अवघ्या 25 मिनिटात ओसरला. परंतु तोवर शकिरगे कुटूंबियावर दुःखाचे सावट पसरले आहे.

