गरसोळी शिवारातील दुहेरी खून प्रकरणी आरोपी गजाआड!
वयोवृद्ध दांपत्याच्या घरी चोरी, विरोध केल्याने वयोवृद्ध दांपत्याचा खून!

लातूर : ‘तू चोर आहेस’, असे नेहमी म्हणाल्याचा राग मनात धरून रेणापूर तालुक्यातील गरसोळी येथे शेत वस्तीवर राहणाऱ्या दांपत्याच्या घरी चोरी करीत त्यांचा खून करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी गजाआड केले. शास्त्रोक्त पध्दतीने तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली. याबाबत माहिती अशी की, दिनांक 25 मे ते 26 मे च्या मध्यरात्री पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील गरसोळी गावातील शेतामध्ये राहत असलेल्या वयोवृद्ध दांपत्याच्या घरी चोरी करीत असताना, विरोध केल्याने वयोवृद्ध कातळे दांपत्याचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चोरून त्याच्या डोक्यात कुकर ने, दगड व विटाने मारून तसेच तिच्या अपंग पतीस उचलून नेऊन बाजूच्या विहिरीत टाकून खून केल्याचे दि. 27/05/2025 रोजी समोर आले होते.
गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पध्दतीने तपासाला सुरुवात!
यावरून 27 मे 2025 रोजी रेणापूर पोलीस ठाण्यात गुरनं. 187/2025 कलम 103(1) 309(4), 331(3)(4) भारतीय न्यायसंहिता प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पध्दतीने तपासाला सुरुवात केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून आटोकाट प्रयत्न करत वयोवृद्ध कातळे दांपत्याच्या मारेकरऱ्याचा शोध घेतला. याप्रकरणी गरसोळी गावातच राहणारा इसम पंडित कोंडीबा रावणकुळे, (वय 32 वर्षे) यास त्याच्या राहत्या ठिकाणाहून 27 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास ताब्यात घेतले.
दांपत्याचा खून करुन महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचे केले कबुल!
त्याच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्ध महिला नेहमी संशयित आरोपीला, ‘तू चोर आहेस’ असे म्हणत असल्याचा राग मनात धरून वयोवृद्ध कातळे दांपत्याचा खून करुन महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबुल केले. आरोपीविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम हे करीत आहेत.
यांनी केली कामगिरी!
पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे तुराब पठाण, राजेश कंचे, संजय कांबळे, नकुल पाटील, सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे यांनी ही कामगिरी केली.

