ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मेळघाटात सध्या घरोघरी गुल्ली… पारंपरिक औषधी गुणयुक्त तेल काढण्यासाठी आदिवासी कुटुंबीयांची तयारी – मेलघाट

आदिवासी समाजात अनेक पिढ्यांपासून गुल्ली तेल स्वयंपाकात वापरण्याची परंपरा आहे.

 

 

अमरावती : भरभरून देणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात सहवास असणाऱ्या मेळघाटात आदिवासी बांधवांच्या गावामध्ये सध्या घरोघरी गुल्ली दिसत आहे. लोणच्यासाठी कैरी फोडतात, तशा या गुल्ली फोडल्या जात आहेत. या गुल्लीतून औषधी गुणयुक्त तेल निघतं. आदिवासी समाजात अनेक पिढ्यांपासून गुल्ली तेल स्वयंपाकात वापरण्याची परंपरा आहे. एक दोन नव्हे तर अनेक व्याधींवर गुणकारी असणारं गुल्ली तेल हा नेमका काय प्रकार आहे? आणि आदिवासी समाजात या गुल्लीचं असणारं महत्व, याबाबत “खरा संवाद” चा हा स्पेशल रिपोर्ट…

 

आधी सिड्डू मग तेल : मेळघाटच्या जंगलात मोठ्या प्रमाणात मोहाची झाडं आहेत. या मोहाच्या झाडाला उन्हाळ्यात मोहर येतो. पहाटेच्यावेळी या झाडावरची फुलं खाली पडतात. ही फुलं वेचून ती सुकवली जातात. त्यानंतर या सुकलेल्या फुलांची सिड्डू अर्थात दारू काढली जाते. ही फुलं बरेच दिवस सुकवून ठेवली जातात. फुलांचा बहार गेला की मे महिन्यात मोहाच्या झाडाला फळं येतात. या फळांना टणक असं आवरण असतं. मोहाच्या याच फळाला कोरकू भाषेत गुल्ली म्हणतात. आता पावसाळ्यात या गुल्लीतून तेल काढलं जातं.

वटवाघळं पाडतात झाडाखाली फळं :“मोहाच्या झाडाला लागलेलं फळं हे मजबूत असतं. मोहाच्या झाडावर मोठ्या संख्येनं वटवाघळं असतात. ही वटवाघळं झाडावरची ही फळं खाली पडतात. त्यानंतर आदिवासी बांधव झाडाखाली पडलेल्या बियांसारखे फळं वेचून घरी आणतात. कडक आवरण असणारी ही गुल्ली घरातील महिला फोडून काढतात. फोडल्यावर ही गुल्ली सुकवली जाते,” अशी माहिती आमझरी येथील रहिवासी हिरा जांभेकर यांनी “ईटीव्ही भारत” शी बोलताना दिली.

खाण्यासोबत मालिशसाठी उपयोग : “हातपाय दुखत असले की गुल्लीचं तेल हाता-पायाला चोळलं की छान आराम मिळतो. गुडघे दुखत असतील, कंबर दुखत असेल तर या तेलानं मालिश केली की वेदना दूर होतात, असं आमझरी गावातील सिड्डू जांभेकर या वृद्ध महिलेनं “ईटीव्ही भारत” शी बोलताना सांगितलं. तसचं, “गुल्लीचं तेल वापरून छान कांदा, लसूण तिकीट टाकून मोहाची भाजी आम्ही करतो. कोणत्याही भाजीत या तेलाचा वापर केला जातो,” असं देखील सिड्डू जांभेकर म्हणाल्या.

नव्या पिढीत ढंग नाही : “गुल्लीचं तेल पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूत खाल्लं जातं. या तेलाची चव थोडी कडू आहे. मात्र मसाला घालून भाजी केली की ते चवदार लागतं. आमच्या अनेक पिढ्यांनी या तेलाचा वापर केलाय. आजची पिढी मात्र हे महत्त्वाचं तेल तिकडं, बाहेरच्या व्यक्तींना देऊन स्वतःसाठी बाहेरचं तेल त्याबदल्यात आणते. आजच्या पिढीत खाण्याचा काही ढंगच उरला नाही, ” अशी खंत सिड्डू जांभेकर यांनी व्यक्त केली. तसंच, “माझ्या घरी मी या सर्व गुल्ली फोडते. बाहेर सुकायला ठेवते. यानंतर माझा मुलगा परतवाडा शहरात जाऊन याचं तेल काढून आणतो, ” असं देखील सिड्डू जांभेकर म्हणाल्या.

गुल्ली तेलाचे फायदे : “खाज, फोड, खरूज, सोरायसीस, त्वचाविकारावर हे तेल अत्यंत गुणकारी आहे. यासोबतच संधिवात आणि अंगदुखीवर हे तेल गरम करून मालिश केल्यास वेदना कमी होते,” अशी माहिती चिखलदरा येथील डॉ. विशाल जयस्वाल यांनी दिली. तसंच, “जीवनिरोधक गुणधर्म असल्यानं एखादी जखम या तेलामुळं पटकन भरते. उष्णतेशी संबंधित विकारावर हे तेल उपयुक्त आहे. डोकं दुखत असल्यास हे तेल कपाळावर लावलं की आराम मिळतो. मेळघाटात अनेक भागात दात दुखण्यावर या तेलाचा वापर होतो. विशेष म्हणजे दातांच्या आजारावरही हे तेल गुणकारी आहे. या तेलानं मालिश केल्यास त्वचा मऊ राहते आणि थकवा अजिबात जाणवत नाही. चिखलदरा आणि धारणी तालुक्यात अनेक ठिकाणी वृद्ध मंडळी खाण्यासाठी हेच तेल वापरतात. या तेलाचं महत्व आदिवासी बांधवांना चांगलं ठाऊक आहे, ” असं देखील डॉ. विशाल जायसवाल यांनी सांगितलं.

खादी ग्राम उद्योग मंडळाचं प्रोत्साहन : “मेळघाटातील हे गुणकारी तेल तयार करून सर्वदूर त्याचा लाभ व्हावा, यासाठी खादी व ग्राम उद्योग मंडळाच्यावतीनं चिखलदरा तालुक्यात अनेक महिला बचत गटांना गुल्ली जमा करून आणणे, त्या फोडणे आणि सुकवण्याचं काम देण्यात आलंय. यामुळं आदिवासी महिलांना रोजगार मिळतोय. चिखलदरा येथील स्फूर्ती क्लस्टरमध्ये लाकडी तेल घाणीत महिला बचत गटांनी आणून दिलेल्या गुल्लीचं तेल काढलं जातं. २०० ग्रॅम तेल २५० रुपये या दरानं विकलं जातं, ” असं स्फूर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.